लासुर्णे : छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक हा राजकीय विषय नसून तो एक शेतकऱ्यांच्या प्रपंचाचा विषय आहे. त्यामुळे छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज आहे.
शरद पवार यांनी नेहमीच शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून समाजकारण राजकारण केले आहे. त्यामुळे छत्रपती कारखान्याची निवडणूक हा काही राजकीय विषय नसून शेतकऱ्यांच्या प्रपंचाचा विषय आहे, तसेच छत्रपती कारखान्याची जबाबदारी पृथ्वीराज जाचक यांनी घ्यावी, अशी आमची अनेक दिवसांपासून मागणी होती. करण जाचक कुटुंबीयांचं यासाठी फार मोठं योगदान असल्याचे मत बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
लासुर्णे (ता. इंदापूर ) येथील पृथ्वीराज जाचक यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेत सुळे बोलत होत्या. यावेळी साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इंदापूर तालुका अध्यक्ष ॲड. तेजसिंह पाटील, कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सागर मिसाळ, उद्योजक कुणाल जाचक, सतीश काटे, शहाजी शिंदे, बाळासाहेब शिंदे आदी उपस्थित होते.
मागील दोन दिवसांत आम्ही सर्व शेतकरी कृती समितीच्या वतीने सर्वपक्षीय मेळावा आयोजित केला होता. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील मेळाव्याला उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी छत्रपतीच्या निवडणुकीसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. त्यावेळी या मेळाव्याला राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, तसेच शेतकरी संघटना आणि सर्वच पक्षाचे सभासद उपस्थित होते. आता सुप्रिया सुळे यांनी सर्वच राजकीय पक्षांनी आपले मतभेद विसरून शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून छत्रपती निवडणुकीमध्ये सहभागी होणार असल्याची भूमिका स्पष्ट केली आहे. या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो की छत्रपतींच्या निवडणुकीसाठी सर्वांनी सहभागी होत सहकार्य करण्याची भूमिका घ्यावी. - पृथ्वीराज जाचक, राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष, तथा छत्रपती कारखान्याचे माजी अध्यक्ष