पुणे : केवळ गंगाच नव्हे तर देशातील सर्व नद्यांचा शुद्धीकरण प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. मुळा-मुठा नदीदेखील शुद्ध करून दाखविणार असल्याचा ठाम विश्वास केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी येथे व्यक्त केला.आर्ट आॅफ लिव्हिंगच्या वतीने आयोजित जलसरिता या नदी शुद्धीकरण प्रकल्पाचे उद््घाटन जावडेकर आणि आर्ट आॅफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी जावडेकर यांनी आपली भूमिका मांडली. आर्ट आॅफ लिव्हिंगच्या वतीने पवना नदीला मिळणाऱ्या पाच नाल्यांवर स्वच्छता मोहीम हाती घेण्यात येणार आहे. या पथदर्शी प्रकल्पांतर्गत येथे विशिष्ट प्रकारचे जैविक द्रव्य (एन्झाइम) पाण्यात मिसळण्यात येणार आहे. त्यामुळे पाण्यातील रासायनिक द्रव्य कमी होण्यास मदत होणार आहे.मैलापाणी सातत्याने प्रवाहात मिसळत असल्याने देशातील नद्या प्रदूषित झाल्या आहेत. मुळा-मुठा नदीचे शुद्धीकरण करणार, असे मी लहानपणापासूनच ऐकत होतो. मात्र, हा प्रकल्प इतकी वर्षे फाईलबंदच होता. मी पुण्याचा असल्याने या प्रकल्पाला तातडीने मंजुरी दिली. आता ही नदी शुद्ध करून दाखविणारच, असे जावडेकर या वेळी म्हणाले.भविष्यात तिसरे महायुद्ध झाले, तर ते पाण्यावरूनच होईल, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करीत आहे. यापुढील काळात पाण्याला येणारे महत्त्व लक्षात घेता जलसंरक्षण हे आपले कर्तव्यच ठरते. घरी आलेल्या पाहुण्याला पहिल्यांदा पाणी देणे ही आपली संस्कृती आहे. पूजेतही आचमनासाठी याचाच उपयोग होतो, असे रविशंकर या वेळी म्हणाले.तत्पूर्वी, झालेल्या कार्यक्रमात कलाकारांनी व वाद्यवृंदांनी श्रीकृष्णावरील रचना सादर केल्या. हरी नारायण हरी ओम... नादे नंदलाला.. झुले नंदलाला या भावगीतांवर भक्तांनी ठेका धरला. लहानथोर या ठेक्यावर नृत्य करताना दिसत होते.
सर्व नद्या शुद्ध करणार
By admin | Published: April 20, 2017 7:02 AM