लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महापालिका क्षेत्रातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा, शैक्षणिक संस्था, महाविद्यालये ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात येणार असून, यातून केवळ इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा असल्यामुळे त्यांना यामधून वगळण्यात आले आहे़ तर सर्व प्रकारच्या सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमास तसेच भूमीपूजन, उद्घाटन समारंभ व तत्सम कार्यक्रमांनाही १ एप्रिल पासून पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे़
महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश शुक्रवारी दिले आहेत़ यामध्ये सर्व कोचिंग क्लासेस (एमपीएससी,युपीएससी वगळून) ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याबाबत व एमपीएससी,युपीएससीचे क्लासेस आसन क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेनुसार सुरू ठेवण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे़
महापालिका क्षेत्रात प्रतिबंधित क्षेत्राबाहेरच केवळ ५० लोकांच्या उपस्थितीत लग्न समारंभ करण्यास परवानगी देण्यात आली आहे़ अंत्यसंस्कार व दशक्रियाविधीकरिता २० लोकांना परवानगी देण्यात आली आहे़
जीवनावश्यक वस्तू वगळता कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक सेवा वगळता १ एप्रिलपासून रात्री अकरा ते सकाळी ६ वाजेपर्यंत पूर्णत: संचारबंदी करण्यात आली आहे़ यातून जीवनावश्यक वस्तू वृत्तपत्र सेवा वगळण्यात आल्या आहेत़
---------------------------------