पुणे: एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच वार्षिक परीक्षा पूर्ण झाल्यानंतर शाळा सुरू असल्या तरी विद्यार्थ्यांची उपस्थिती फारशी नसते. याचा विचार करून राज्यातील सर्व शाळांमध्ये एकवाक्यता असावी आणि विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी उपलब्ध वेळेचा पुरेपूर उपयोग व्हावा यासाठी वार्षिक परीक्षा व संकलित चाचणी २, नियतकालिक मूल्यांकन (पीएटी) चाचण्यांचे आयोजन एकाच वेळी केले जाणार आहे. येत्या ८ एप्रिल ते २५ एप्रिल या कालावधीत या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. याबाबतचे परीक्षांचे वेळापत्रकही जाहीर करण्यात येत आहे, असे परिपत्रक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांनी काढले आहे. तसेच राज्यातील सर्व शाळांच्या वार्षिक परीक्षा या एकाच वेळी घेण्यात याव्यात, अशा सूचना शिक्षण उपसंचालक (प्रशासन) रजनी रावडे यांनी दिल्या आहेत.
राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिली ते नववीच्या परीक्षा साधारणपणे मार्चअखेरीस अथवा एप्रिल महिन्यामध्ये शाळास्तरावरून घेण्यात येतात. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीस वार्षिक परीक्षा पूर्ण झाल्यास त्यानंतरच्या कालावधीत शाळा सुरू असल्या तरी विद्यार्थी उपस्थिती पुरेशी असत नाही. अशा पद्धतीने परीक्षांचे आयोजन वर्षअखेर करण्याऐवजी लवकर केल्यामुळे विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी मिळणारा कालावधी कमी होतो. तसेच प्रत्येक शाळेचे वेळापत्रक वेगवेगळे असल्याचे निदर्शनास येते. यासाठी राज्यातील शाळांमध्ये वर्षअखेरीस घेण्यात येणारे मूल्यमापन एप्रिल महिन्याच्या उत्तरार्धात करण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे. राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी अनुदानित शाळांमध्ये इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचण्यांचे (पॅट) आयोजन करण्यात येत आहे.
यास अनुसरून २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १ व संकलित मूल्यमापन चाचणी-२ अशा तीन चाचण्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याबरोबरच चालू शैक्षणिक वर्षात राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते नववीच्या वार्षिक परीक्षांचा कालावधी समान ठेवण्यासाठी काही सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. त्यामध्ये संकलित मूल्यमापन-२ साठी परीक्षांचे आयोजन शाळा स्तरावरून करण्यात येईल. त्यासाठी प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकाचा वापर करण्यात यावा. इयत्ता पाचवी आणि आठवीच्या वर्गांसाठी वार्षिक परीक्षा स्वतंत्रपणे शाळांनी सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका स्वतः तयार करून घ्यायची आहे. पॅट ३ अंतर्गत दिलेल्या प्रश्नपत्रिका वार्षिक परीक्षा म्हणून वापरता येणार नाही, अशा सूचनांचा यात समावेश आहे.