लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरात कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्याने आज (सोमवारी) महापालिकेने पुणे शहरातील निर्बंध शिथिल केले आहेत़ यामध्ये जीवनावश्यक वस्तूंसह (अत्यावश्यक सेवा) इतर सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवारपर्यंत सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत खुली ठेवण्यास परवानगी दिली आहे़ मात्र शनिवारी, रविवारी केवळ जीवनावश्यक वस्तूंचीच दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत खुली ठेवण्यास मान्यता आहे़ ही सवलत दहा दिवसांसाठीच दिली असून, त्यानंतर कोरोनाची स्थिती पाहून पुढील निर्णय होणार आहे.
राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे, पुणे शहरासाठी लॉकडाऊन शिथिल करतानाची नवीन नियमावली महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी आज जाहीर केली़ यामध्ये पुणे महापालिका क्षेत्रातील सर्व बँका कामाच्या दिवशी सुरू राहतील़ तर ई-कॉमर्स मार्फत अत्यावश्यक सेवा व वस्तू तसेच अत्यावश्यक व्यतिरिक्त वस्तू यांचीही घरपोच सेवा सुरू करण्यास परवागनी देण्यात आली आहे़
या नव्या निर्णयामुळे शहरात किराणा, भाजीपाला, मेडिकल, दूधविक्री आदी अत्यावश्यक सेवांसह, कपडे, स्टेशनरी, संगणक विक्री, सोने-चांदी आदी इतर सर्व व्यवसायांना आपले व्यवसाय सुरू ठेवण्यास मार्यादित कालावधीकरिता मान्यता मिळाली आहे़ यामध्ये मद्यविक्रीच्या दुकानांचाही समावेश आहे़ मात्र रेस्टॉरंट व बार हे फक्त पार्सल / घरपोच सेवेसाठी सेवा देऊ शकणार आहेत़ तर कृषी संबंधित दुकाने आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना (बी-बियाणे, खते, उपकरणे व त्याच्याशी निगडित देखभाल व दुरुस्त सेवा इत्यादी) तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती हे आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत खुली ठेवण्यास परवानगी दिली गेली आहे़
महापालिका हद्दीतील सर्व शासकीय कार्यालये (अत्यावश्यक / कोरोनाविषयक कामकाज करणाऱ्या कार्यालयांव्यतिरिक्त) २५ टक्के अधिकारी / कर्मचारी यांच्या उपस्थितीत ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे़
---------------------
दुपारी ३ नंतर पूर्णत: संचारबंदी
महापालिकेने लॉकडाऊन शिथिल करताना सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत दुकानांना परवागनी दिली आहे़ मात्र, दुकाने बंद झाल्यावर एक तासाच्या कालावधीनंतर म्हणजे दुपारी ३ नंतर नागरिकांना वैद्यकीय सेवा व इतर अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही़ दुपारी तीननंतर अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांना घराबाहेर पडण्यास संपूर्णत: प्रतिबंध (संचारबंदी) करण्यात आला आहे़
शहरासाठी जाहीर करण्यात आलेले हे आदेश १ जूनपासून पुढील १० दिवस लागू राहणार आहेत़ त्यानंतर कोरोना पॉझिटिव्हिटीबाबतचा आढावा घेऊन, त्याअनुषंगाने पुढील आदेश काढण्यात येणार असल्याचेही आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले आहे़
-----------------------------
मॉल, शॉपिंग कॉम्पलेक्स, आठवडी बाजार बंद राहणार
शहरात गर्दी होणारी ठिकाणे म्हणजेच, मॉल, शॉपिंग कॉम्पलेक्स, आठवडी बाजार सुरू करण्यास अद्याप महापालिकेने परवानगी दिलेली नाही़ तसेच लग्न समारंभ, सभा-समारंभ आदी कार्यक्रमांवरील निर्बंध अद्यापही कायम आहेत़ यात कोणतीही सुट देण्यात आलेली नाही़
---------------