लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गणेश विसर्जनाच्या दिवशी संभाव्य गर्दीची शक्यता लक्षात घेता रविवारी (दि. १९) पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि कॅन्टोनमेंट क्षेत्रात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे; मात्र रेस्टॉरंट आणि हॉटेल्स सुरू राहतील; तसेच सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून, परिस्थिती आटोक्यात आल्यास येत्या दोन ऑक्टोबरला बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येतील, अशी माहिती उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे दिली.
विभागीय आयुक्त कार्यालयात अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील जिल्ह्याची कोरोना आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, आमदार दिलीप मोहिते, ॲड. अशोक पवार, सुनील टिंगरे, सिद्धार्थ शिरोळे, संजय जगताप, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पिंपरी-चिंचवडचे महापालिका आयुक्त राजेश पाटील, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, यावेळी उपस्थित होते.
पवार म्हणाले की, सध्या कोरोना बाधित रुग्ण आणि मृत्यूदरात घट झाली आहे. रुग्णवाढीचा दर ०.०५ टक्क्यांवर आला आहे. शहर आणि जिल्ह्यात आजअखेर ९३ लाख नागरिकांना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. या सप्टेंबर महिन्यातही १९ लाखांचा टप्पा ओलांडण्याचा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहे. पुणे जिल्ह्यात ७७ टक्के लोकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस तर, ४१ टक्के नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. लसीकरण झालेल्या नागरिकांमध्ये बाधित होण्याचे प्रमाण हे ०.०३ टक्के इतके आहे. अद्यापही काही काळ दक्षता घेणे गरजेचे आहे. त्यामुळे रविवारी गणेश विसर्जनाच्या दिवशी खबरदारी म्हणून पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्र तसेच तिन्ही कॅन्टॉनमेंट क्षेत्रातील दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती पवार यांनी दिली.
----------
दोन्ही डोस घेतलेल्यांना जलतरण तलावात सरावास परवानगी
कोरोना लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेल्या जलतरण खेळाडूंना जलतरण तलावात सरावासाठी अनुमती देण्यात येईल. कोरोना रुग्णांचे प्रमाण चांगलेच कमी झाले असून, अशी परिस्थिती राहिल्यास गणेश उत्सवानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक निर्णय घेण्यात येतील, असे पवार यांनी स्पष्ट केले.
---------