पुणे : पुण्यात मंग्ळवारपासून (दि. १) सर्व प्रकारची दुकाने रोज सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. जीवनावश्यक वस्तूंशिवाय इतर दुकानेही सोमवार ते शुक्रवारपर्यंत सुरू राहणार आहेत. शनिवार आणि रविवारी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडून इतर दुकाने बंद राहणार आहेत. शासकीय कार्यालयांतही २५ टक्के उपस्थिती राहणार आहे. दुपारी तीन वाजल्यापासून मात्र कडक संचारबंदी लागू असणार आहे. पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. कोरोना पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
अत्यावश्यक सेवेची दुकाने ही आठवड्यातील सर्व दिवस रोज सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहतील. मद्यविक्रीची दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहतील. अत्यावश्यक दुकानांव्यतिरिक्त इतर दुकाने (मॉलला परवानगी नाही) सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहतील. रेस्टॉरंट व बार हे फक्त पार्सल/ घरपोच सेवेसाठी सुरू राहतील. पुणे महानगरपालिका क्षेत्रात ई-कॉमर्समार्फत अत्यावश्यक वस्तू व सेवा तसेच अन्य वस्तूंचीही घरपोच सेवा सुरू करण्यास मुभा राहील. पुणे महानगरपालिका क्षेत्रात दररोज दुपारी ३ नंतर वैद्यकीय सेवा व इतर अत्यावश्यक कारण / अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांना घराबाहेर पडण्यास संपूर्णतः प्रतिबंध (संचारबंदी) राहील. तसेच घरपोच सेवा देण्यास यापूर्वी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशानुसार परवानगी असेल.
कृषीसंबंधित दुकाने आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना (बी-बियाणे, खते, उपकरणे व त्यांच्याशी निगडीत देखभाल व दुरुस्ती सेवा इत्यादी) तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती हे आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहतील.