या व्यक्तीने आतापर्यंत केलेली आंदोलने राज्याच्या नुकसानीची होती; अजित पवारांची राज ठाकरेंवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2022 02:38 PM2022-05-06T14:38:46+5:302022-05-06T15:04:35+5:30
राज ठाकरेंच्या भोंग्यांच्या भूमिकेनंतर महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले आहे
पुणे : राज ठाकरेंच्या भोंग्यांच्या भूमिकेनंतर महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले आहे. त्यांच्या भूमिकेबाबत विरोध आणि समर्थन दोन्ही गोष्टी होऊ लागल्या आहेत. विरोधी पक्षांकडून या भूमिकेला विरोध होत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राज ठाकरेंवर निशाणा साधला जात आहे. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीसुद्धा राज ठाकरेंच्या या भूमिकेवर टीका केली आहे. या व्यक्तीने आतापर्यंत जे जे आंदोलन केलीत ती राज्याच्या, समाजाच्या नुकसानीची होती. असा टोला पवार यांनी लगावला आहे. पुण्यात जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीसाठी विभागीय आयुक्त कार्यालय येथे आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पवार म्हणाले, ज्यांनी भोंगे या संदर्भात मुद्दा पुढे आणला, पण याच व्यक्तीने टोल बंद करणार म्हणून सांगितलं होतं. पण काही पुढे झालं नाही. या व्यक्तीने आतापर्यंत जे जे आंदोलन केलीत ती राज्याच्या, समाजाच्या नुकसानीची होती. आज टोल घेतला म्हणूनच एवढे मोठे मोठे रस्ते, हायवे झालेत. मागे पण युपी, बिहारवाल्यांना पण हटवा म्हटलं होतं. पण मोठ्या शहरातली बांधकाम बंद पडली होती. हॉकर्स वाल्याना पण त्रास दिला होता पण तेही फेल गेलं.
हे सगळं चाललंय ते थांबलं पाहिजे
साधं दुधाच्या धारा काढायला बाहेरचे लोक येतात. आपल्याकडे लोक मशीन लावतात. आज सकाळीच पोलिसांसोबत माझी बैठक झाली, नियम काय आहे की सकाळी 6 ते 10 आहे. हे सगळं चाललंय ते थांबलं पाहिजे, सगळ्यांच्याच धार्मिक स्थळांबाबत आपण नतमस्तक होतो. आपल्याकडे आठ आठ दिवस रात्री उशीरा सप्ताह चालतात. बंद करायचं तर सगळंच बंद करावं लागेल. पण आता कोणीही असो तो जर कायदा मोडत असेल तर अजिबात मी ऐकणार नाही. बोलणारे बोलतात, गॅलरीतून इकडे तिकडे बघतात, आणि बाजूला राहतात. आज आपल्यापुढे वेगळे विषय आहेत, कारण नसताना नको ते विषय लोकांच्या मनात घालायचं काम सुरुये. कोणाला भोंगे लावायचे आहेत त्यांनी किती डेसीबील मध्ये चे नियम आहेत ते बघून, परवानगी घेऊन लावावं.