- नितीन ससाणे
जुन्नर (पुणे) : गेल्या दोन दिवसांपासून कुकडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्यामुळे हा पाणीसाठा ९२.११ टक्के झाला आहे. गतवर्षी याच दिवशी या धरणांमधील पाणीसाठा २८.१८ टीएमसी होता. तसेच माणिकडोह धरणात ७८.८४ टक्के व पिंपळगाव जोगा या धरणात ८३.०५ टक्के पाणीसाठा सध्या उपलब्ध आहे. पुणे व नगर जिल्ह्यासाठी वरदान ठरणाऱ्या कुकडी प्रकल्पातील एकूण सहा धरणात यावर्षी समाधानकारक पाणीसाठा असून योग्य नियोजन केल्यास पुढील वर्षी पावसाळा सुरू होईपर्यंत शेती तसेच पिण्याच्या पाण्यासाठी कोणतीही अडचण होणार नसल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. कुकडी प्रकल्पातील सर्व धरणे काठोकाठ भरलेली आहेत.
तीन टीएमसी क्षमता असलेले येडगाव धरण ९६.५६ टक्के भरले आहे. वडज धरण एक टीएमसी क्षमतेचे असून त्यातील पाणीसाठा ९९ टक्के झाला आहे. या साखळी धरणांतील माणिकडोह ७८.८४ टक्के व पिंपळगाव जोगा धरणात ८३.०५ टक्के पाणीसाठा आहे. माणिकडोह धरणाची क्षमता सव्वासात टीएमसी एवढी आहे. कुकडी प्रकल्पातील साखळी धरणांमध्ये ९२.११ टक्के पाणीसाठा झाल्यामुळे पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, शिरूर तालुक्यातील तर नगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत व सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यांतील शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण आहे. कारण याच कुकडी प्रकल्पातील धरणातील पाणीसाठ्यावर या शेतकऱ्यांचे जीवन अवलंबून आहे.
कुकडी प्रकल्पांतर्गत धरणे व उपयुक्त पाणीसाठा -
माणिकडोह - ७८.८४ टक्के
वडज - ९९ टक्के
येडगाव - ९६.५६ टक्के
पिंपळगाव जोगे - ८३.०५ टक्के
चिल्हेवाडी - ९८.१२ टक्के
डिंभे - ९७.११ टक्के