पुणे : पुण्यातील प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर रुग्णांच्या जीवापेक्षा पैशांना प्राधान्य दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. २९ मार्च रोजी झालेल्या या दुर्दैवी घटनेत तनिषा भिसे (वय २७) या सात महिन्यांच्या गर्भवती महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाला. त्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. डॉ सुश्रुत घैसास यांनी तनिषा भिसे यांच्या कुटुंबियांकडून १० ते २० लाख मागितल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. त्यानंतर आज डॉ सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिला आहे. हॉस्पिटल प्रशासनाची होणारी बदनामी आणि रुग्णांची होणारी गैरसोय पाहता सुश्रुत घैसास यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. घैसास यांचा राजीनामा दीनानाथ रुग्णालय प्रशासनाला सुपूर्द करण्यात आला आहे. डॉ केळकरांनी पत्रकार परिषदेत घैसास यांचे राजीनामा पत्रच वाचून दाखवले आहे.
केळकर म्हणाले, घैसास यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्याचं कारण त्यांनी असं दिलंय की, गेल्या काही दिवसातील सामाजिक प्रक्षोभामुळे आपण अत्यंत दडपणाखाली वावरत आहोत हे त्यांनी नमूद केलंय. धमक्यांचे फोन समाज माध्यमांवर होणारी कठोर टीका व सामाजिक संघर्षग्रस्त तणावाचे वातावरण हे त्यांच्या स्वतःच्या सहन करण्या पलीकडचे आहे. व त्यांचा त्यांच्या आताच्या रुग्णांच्या उपचारावर वर सुद्धा परिणाम होईल अशी त्यांना भीती वाटत आहे. या परिस्थितीमध्ये त्यांच्या वैद्यकीय विषयावर पुरेशा प्रमाणावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. रात्री झोपू तर शकतंच नाहीयेत. त्यामुळं इतर रुग्णांवर अन्याय होण्यापेक्षा तसेच आपल्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेच्या व हिताच्या दृष्टीने त्यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील आपल्या पदाचा राजीनामा देत आहे. या प्रकरणाची व्याप्ती व गांभीर्य लक्षात घेऊन रुग्णालय प्रशासनाने त्यांच्या राजीनामा पत्र लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशन या विश्वस्त मंडळासमोर ठेवला आहे. पण माझी खात्री आहे की विश्वस्त मंडळ ते स्वीकारेल. यांच्या देखरेखीखाली आत्ता असलेल्या रुग्णांची दोन ते तीन दिवसात पर्यायी व्यवस्था होईल. तेवढे दोन तीन दिवस ते त्यांचं आहे ते काम ऑपरेशन केलेले रुग्ण या गोष्टी संपवतील आणि माझ्या अंदाजे गुरुवारपासून ते आपल्या पदावरून मुक्त होतील असे केळकर यांनी सांगितले आहे.