निरगुडसर : आंबेगाव तालुक्यातील शिंगवे (पारगाव येथील वाडीमळ्यातील) येथील मीना नदीपात्रात रविवारी बुडालेल्या तिन्ही मुलांचे मृतदेह शोधण्यास एनडीआरएफच्या पथकाला सोमवारी यश आले. रविवारी (दि. २९) दुपारी ही घटना घडली होती. वैभव चिंतामण वाव्हळ (वय १६), श्रेयश सुधीर वाव्हळ (वय १५), प्रणव राजेंद्र वाव्हळ (वय १५, सर्व रा. शिंगवे पारगाव) अशी बेपत्ता मुलांची नावे होती. हे तिघेही रविवारची सुटी असल्याने मीना नदीत पोहायला गेले होते. बराच वेळ होऊनही ते घरी न आल्याने घरच्यांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. नदीच्या बाजूला त्यांचे कपडे आढळल्याने त्यांनी नदीपात्रात त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुले सापडली नसल्याने एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले. रविवारी रात्र झाल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली. मात्र, पथकाने सोमवारी सकाळी मुले पोहत असलेल्या ठिकाणी शोध घेतला. तासाभरात या तिन्ही मुलांचे मृतदेह सापडले. तीनही मुले एकुलती असल्यामुळे या मुलांच्या मृत्यूने वाव्हळ कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. या घटनेमुळे सोमवारी शिंगवे गाव बंद ठेवले. तिघेही येथील भैरवनाथ विद्यालयात शिक्षण घेत होती. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी त्वरित घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली. संबंधित कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी होऊन त्या कुटुंबीयांना धीर देत त्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. या वेळी त्यांच्यासमवेत मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम व अनेक मान्यवर उपस्थित होते.
आंबेगाव तालुक्यातील मीना नदीत बुडालेल्या तीनही मुलांचे मृतदेह सापडले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2019 1:17 PM