- दीपक मुनोत -पुणे: कोरोना महामारीचा कहर सर्वत्र झालेला असताना आमच्या कंपनीतील शास्त्रज्ञ, कर्मचारी यांनी घेतलेल्या अथक परिश्रमाचे आज चीज झाले, अशी भावना सिरम इन्स्टिट्यूटचे सहायक निर्यात अधिकारी हनुमंत अलकुंटे यांनी व्यक्त केली.
सिरम कंपनीने तयार केलेल्या ʻकोविशिल्डʼ या लसीची वाहतुक करणाऱ्या कोल्ड चेन व्हॅनचा पहिला ताफा लोहगाव विमानतळाकडे रवाना झाल्यानंतर अलकुंटे ʻलोकमतʼ बरोबर बोलत होते.ते म्हणाले, कोरोनामुळे जगभरात हाहाकार माजला असताना आमच्या कंपनीचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लस तयार करण्यासाठी वाहून घेतले होते.
एकीकडे प्रचंड मेहनत आणि दुसरीकडे कोरोनाची दहशत, यातुन आम्ही मार्ग काढत अखेर लस तयार करण्यात यशस्वी झालो. या कठीण काळात, आमच्या कंपनीतील अनेकांना कोरोना झाला मात्र आमचे मालक आदर पुनावाला यांनी, बाधित कर्मचारी, त्यांचे कुटुंबिय आणि आमची खुप काळजी घेतल्याने, आलेल्या प्रत्येक संकटाले आम्ही धीरोदात्तपणे सामोरे गेलो.आमची कंपनी १८ प्रकारच्या लसी तयार करते.मात्र गेले काही महिने आम्ही केवळ कोरोनावर लक्ष केंद्रीत केले होते.
कोरोनामुळे, मानवाच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला असताना आम्ही संपुर्ण मानव जातीला दिलासा देण्यात यशस्वी होत आहोत. त्यामुळे आमच्या कष्टाचे आज खऱ्या अर्थाने चीज झाले असून आमचे जीवन सार्थकी लागले, अशी कंपनीतील प्रत्येकाची भावना आहे, असेही अलकुंटे म्हणाले.सोमवारी सकाळी कामावर आलेले अलकुंटे यांनी गत २४ तासात केवळ तीन तास विश्रांती घेतली, यावरून गेल्या काही दिवसांपासून कंपनीत सुरू असलेल्या धांदलीची कल्पना येते.