चाकण : “चाकण परिसरात अनेक नवनवीन उद्योगांची उभारणी झालेली आहे. यामुळे परिसराचा विकास होत असल्याचे दिसत असले तरीही त्यातून काही प्रमाणात समस्या देखील तयार होत आहेत. धामणे परिसरात अल्पवयीन मुलीचा अकस्मातपणे गायब होऊन तिला आलेला मृत्यूचे नेमके कारण अजून समजत नाही. मात्र यामागे कोणते कारण आहे याचा तपास लवकरच लागेल. या पार्श्वभूमीवर परिसरात रोजगारासाठी येणाऱ्या सर्व कामगारांची नोंदणी व अधिकृतरित्या माहिती ठेवणे सर्व आस्थापनांना बंधनकारक करावे,” अशी मागणी नीलम गोऱ्हे यांनी येथे केली.
धामणे परिसरात एका अल्पवयीन मुलीच्या झालेल्या खुनामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. काल चाकण पोलीस स्टेशनला आ. डॉ. गोऱ्हे यांनी भेट देऊन पोलीस अधिकाऱ्यांकडून सुरु असलेल्या तपासाबाबत माहिती घेतली. खेडचे आमदार सुरेश गोरे हे देखील यावेळी उपस्थित होते. आ. डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, ‘अशा पद्धतीने तरुण मुलींवर हल्ला होणे व सदर घटनेला तीन दिवस होऊनही कुणालाही याचा सुगावा देखील न लागणे हे एक न उलगडणारे कोडे आहे. यातून अंधश्रद्धेच्या मानसिकतेमधून घातपाताचा प्रकार झाला की काय असा प्रश्न निर्माण होत आहे. पोलीस यंत्रणा यासाठी कसून तपास करीत आहे. लवकरच यातील सत्य बाहेर येईल.’
यावेळी पोलीस उपायुक्त शुभांगी सातपुते, उप विभागीय अधिकारी राम पठारे, तपास अधिकारी दयानंद गावडे, पोलीस निरीक्षक प्रकाश धस आदी अधिकारी व शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश वाडेकर, महिला आघाडीच्या विजया शिंदे, नंदा कड, नगरपरिषदेच्या नगरसेविका व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रश्नाबाबत विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनातदेखील डॉ. गोऱ्हे पाठपुरावा करणार आहेत.