सोमेश्वरनगर : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची ५३वी वार्षिक सभा आरोप-प्रत्यारोपांनी गाजली. या वेळी भाग विकास निधी कपात करणे, ऊस वाहतूक खर्च, वाहनांच्या उचली, बेसल डोस, उसाचे मूल्यांकन आदी विषयांवर चर्चा झाली.कारखानास्थळावर ही सभा पार पडली. या सभेला ज्येष्ठ नेते शिवाजीराव भोसले, रामचंद्र भगत, सतीश खोमणे, शहाजी काकडे, दिलीप खैरे, भरत खैरे, संभाजी होळकर, विजय कोलते, विजय सोरटे, दिगंबर दुर्गाडे, प्रमोद काकडे, लक्ष्मण चव्हाण, बी. जी. काकडे, तुकाराम जगताप, बापूराव सूर्यवंशी, रमाकांत गायकवाड, सुदाम इंगळे, दत्ताजी चव्हाण यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी कारखान्याच्या प्रास्ताविकात कामकाजाचा आढावा घेतला. सहा लाख पासष्ट हजार टन उसाचे गाळप करीत चांगला साखर उतारा राखत उपपदार्थनिर्मिती पदार्थ प्रकल्पातून चांगला नफा मिळवला. तसेच ६४ कोटींचे कर्ज फेडल्याचे सांगितले. ३१ कोटींच्या लांबणीवर टाकलेल्या खर्चाची भरपाई केल्याची सांगत ७०:३० या सूत्रानुसार २७८५ व ऊस प्रोत्साहन अनुदान ११५ रुपये असा २९०० रुपये प्रतिटन दर २०१६-१७ बसत असल्याचे सांगितले.कृती समितीचे नेते सतीश काकडे यांनी माहिती वेळेवर दिली जात नाही. बेसल डोसमध्ये मोठा गैरव्यवहार आहे. चोºया लबाड्या चालल्या आहेत. मागील अहवाल हे बोगस आहेत. कर्ज फेडले नसून १८०-१९० कोटी आपल्याकडून वसूल केले आहेत. जाणीवपूर्वक कमी मूल्यांकन करीत भाव मुद्दाम कमी देत असल्याचा आरोप केला. आता चार हजार प्रतिटन दर बसत असल्याचे त्यांनी सांगितले.या वेळी प्रमोद काकडे यांनी कारखान्याकडे लेखी माहिती मागूनही दिली जात नाही, तर अजय कदम व जोतिराम जाधव यांनी इतिवृत्तामध्ये सभासदांनी दिलेल्या सूचना मांडल्या जात नाहीत. यावर अध्यक्ष जगताप यांनी पुढील अहवालात हा मुद्दा घेतला जाईल, असे सांगितले. कांचन निगडे यांनी संस्थेकडे असलेल्या थकीत रकमा वसूल करण्याची सूचना केली. दुष्यंत चव्हाण यांनी सभासदांच्या आजारपणासाठी आर्थिक तरतूद करण्याची सूचना केली. याला सभागृहाने मंजुरी दिली. सतीश काकडे यांनी अहवाल व पत्रके बोगस आहेत. यामध्ये आकड्यांची जुळवाजुळव केली आहे, असा आरोप केला. कोर्टवर कारखान्याने १ कोटी ७२ लाख खर्च केले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून चुकीचे मूल्यांकन करून सभासद मारला आहे. दुपारी एक वाजता सुरू झालेली सभा रात्री उशिरापर्यंत सुरू होती.या वेळी प्रमोद काकडे, मदन काकडे, जोतिराम जाधव, दुष्यंत चव्हाण, विलास होळकर, भाऊसाहेब भोसले, अजय कदम, शिवदास तांबे, दत्ताजी चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत सभा रंगली होती.>त्यांनी खुशाल साखर आयुक्तांकडे जावे...सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप म्हणाले, की ठराविक मंडळींना कारखाना खड्ड्यात घालायचा आहे. गेल्या चार वर्षांत २२० कोटींची कर्जफेड केली. मात्र, एवढी कर्जफेड केली असताना नेहमी दराच्याबाबतीत कर्ज नसणाºया माळेगावशी तुलना केली जाते. अहवालाबाबत ज्या सभासदांना शंका असतील, त्यांनी खुशाल साखर आयुक्तांकडे जावे.
आरोप-प्रत्यारोपांनी सभा गाजली, बेसल डोसमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचा सतीश काकडे यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 12:18 AM