पुणे : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसह महामंडळाच्या कारभारावरून राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाने चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षांवर आरोपांची जंत्री सुरू केली आहे.
अध्यक्ष हे जाणीवपूर्वक कोरोनाचे कारण पुढे करून जास्तीचा एक वर्षाचा कालावधी वाढवून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. पाच वर्षांत महामंडळाची एकही वार्षिक सर्वसाधारण सभा घेतली नाही. त्यामुळे महामंडळावर प्रशासक नेमावा. महामंडळाच्या ठेवी मोडून साधारण आठ ते नऊ कोटी रुपये महामंडळाच्या नवीन कार्यालयांकरिता खर्च केल्याचा आरोप राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी केला. चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. महामंडळाच्या कार्यकारिणीची मुदत पाच मे रोजी संपत आहे. त्यापूर्वी सर्वसाधारण सभा घेतली जाईल. कोणताही अभ्यास न करता आरोप केले जात असल्याचे राजेभोसले यांनी स्पष्ट केले.
अखिल भारतीय चित्रपट महामंडळावर प्रशासक नेमावेत. या बाबतीतील निवेदन बाबासाहेब पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व कोल्हापूर धर्मादाय उपायुक्तांना दिले आहे. महामंडळाच्या सर्व कारभाराचा हिशोब नवीन प्रशासक समितीने महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांना विचारावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच ज्या ठिकाणी अध्यक्षांनी मुंबई, पुणे, कोल्हापूर या ठिकाणी नवीन कार्यालय घेतले, तिथे एवढा अवास्तव खर्च न करता स्थानिक महानगरपालिकेकडून किंवा शासनाकडून ९९ वर्षांच्या करारावर महामंडळाच्या कार्यालयाकरिता जागा घेता येऊ शकत होती किंवा अशी जागा शासनाकडून किंवा महापालिकेकडून जर घेतली गेली असती तर महामंडळाच्या ठेवी या वाचल्या असत्या. हा अवास्तव खर्च वाया गेला नसता आणि ठेवींच्या व्याजावर त्या कार्यालयाचे भाडे दिले गेले असते, पण महामंडळाच्या अध्यक्षांच्या हट्टापायी तीनही जिल्ह्यांमध्ये नवीन कार्यालये घेण्यात आली. कलाकारांच्या कष्टाचा पैसा चित्रपट महामंडळाने अशा प्रकारे उधळपट्टी करून खर्च केला असल्याचा आरोप पाटील यांनी केला.
कोट
“चित्रपट महामंडळाने दहा कोटी रूपयांच्या ठेवी केल्या. मात्र ठेवींवर कर बसत असल्याने संचालकांच्या परवानगीनेच ठेवी मोडण्यात आल्या. कुठलाही अभ्यास नसताना वक्तव्य करण्यात येऊ नये. राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाने सत्तेचा दुरूपयोग करू नये.”
-मेघराज राजेभोसले, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ