नीरा (पुणे) : बारामती आणि पुरंदर तालुक्यासाठी कार्यक्षेत्र असलेल्या नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चुरशीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या आघाडीने निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. आघाडीने सर्वच्या सर्व जागांवर म्हणजे १८ जागांवर विजय संपादन करत बाजार समितीवर आपलं वर्चस्व सिद्ध केले आहे.
नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे शिवसेना यांच्यावतीने सोमेश्वर सहकार पॅनलच्या वतीने १८ उमेदवार उभे केले होते. यामधील व्यापारी मतदारसंघातील दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. तर शिवसेना भाजप यांच्या वतीने १३ उमेदवार उभे करण्यात आले होते.
काल शुक्रवारी ९४.६७ टक्के मतदान झाले होते. आज शनिवारी सकाळी मतमोजणी सुरू झाल्यावर सर्वात कमी मतदार असलेल्या हमाल मापाडी मतदार संघाचा निकाल जाहीर झाला. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे उमेदवार विक्रम दगडे यांना १२० पैकी ८२ मते पडली, विरोधी उमेदवार नितीन दगडे यांना ३५ मते मिळाली तर ३ मते बाद झाली होती. या झालेल्या मतमोजणीमध्ये सोसायटी मतदारसंघांमध्ये आघाडीने एकतर्फी विजय संपादित केला, तर ग्रामपंचायत मतदार संघामध्ये युतीने आघाडीला सुरुवातीला जोरदार टक्कर दिली मात्र बारामती तालुक्यातील मतदान मिळवण्यात युतीला यश आले नाही आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
उमेदवार निहाय्य मतांची आकडेवारी पुढीलप्रमाणे- सोसायटी मतदार संघ सर्वसाधारण जागी कामठे देविदास संभाजी १,३५५, कामठे वामन आश्रु १,३४३, जगदाळे बाळासो गुलाब १,३४१, जगताप शरद नारायणराव १,३२८, निगडे अशोक आबासो १,३२४, निलाखे पंकज रामचंद्र १,२९३, फडतरे संदिप सुधाकर १,२८६, सोसायटी महिला प्रतिनिधि मतदार संघ वाबळे शरयु देवेंद्र १,४०९, शेख शहाजान रफीक १,३६५, सोसायटी मागास प्रवर्ग टिळेकर महादेव लक्ष्मण १,५०९, गुलदगड भाऊसाहेब विठ्ठल १,४२४, ग्रामपंचायत सर्वसाधारण प्रतिनिधी होले गणेश दत्तात्रय ५७३, शिंदे बाळु सोमा ५५५, ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी कांबळे सुशांत राजेंद्र ५५८, ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक मतदार संघ नाझीरकर मनिषा देवीदास ५३५, हमाल व तोलारी मतदार संघ दगडे विक्रम पांडुरंग ८२ मते मिळवून विजयी झाले आहेत.