पुणे : महाराष्ट्राने कायम देशाला चांगली राजकीय दिशा देण्याचे काम केले आहे. परंतु, सध्या अस्तित्वात असणारी आघाडी सरकार सुडाच्या भावनेने काम करत आहे, असा इशारा भाजप युवा मोर्चाचे पुणे शहराध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी दिला.
विरोधी पक्षाच्या नेत्यांची सुरक्षा व्यवस्था काढून टाकण्याची खोडसाळ कृती या सरकारने केली आहे. हे सरकार भारतीय जनता पक्षाला घाबरले आहे. या राज्यात महिला सुरक्षित नाहीत, देव सुरक्षित नाही, विरोधी पक्षाचे नेते कसे सुरक्षित राहतील.
राज्यात महिलांवर रोज अत्याचार होत आहेत. बलात्काराच्या घटना वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी यापूर्वी आमची सुरक्षा काढून ती महिलांसाठी द्या, असे सांगितले आहेच. आम्ही देखील सरकारच्या या सुरक्षेवर अवलंबून नाही. आमच्या नेत्यांना सुरक्षा देण्यासाठी आमची मनगटे खंबीर आहेत. या पुढील काळात पुणे दौऱ्यावर असताना भाजपच्या नेत्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी पुणे शहर युवा मोर्चा घेण्यास सक्षम आहे.