Pune Vidhan Sabha 2024 : युती की आघाडी, मतांचा वाढलेला टक्का कोणाला साथ देणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2024 01:29 PM2024-11-22T13:29:33+5:302024-11-22T13:36:55+5:30

सध्या शिराेळे यांचे पारडे जड असले तरी मतांचा टक्का वाढल्याने यंदा काेण विजयी हाेणार? हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.

Alliance or alliance, who will support the increased percentage of votes | Pune Vidhan Sabha 2024 : युती की आघाडी, मतांचा वाढलेला टक्का कोणाला साथ देणार?

Pune Vidhan Sabha 2024 : युती की आघाडी, मतांचा वाढलेला टक्का कोणाला साथ देणार?

पुणे :शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात महायुतीतर्फे भाजपचे विद्यमान आमदार सिध्दार्थ शिराेळे आणि महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे दत्ता बहिरट यांच्यामध्ये थेट लढत झाली. गतवर्षी अटीतटीच्या लढतीत ५ हजार १२४ मतांनी दत्ता बहिरट यांचा पराभव झाला हाेता. दरम्यान, मागील निवडणुकीत ४३.८० टक्के मतदान झाले हाेते. त्यातुलनेत यंदा ५०.९० टक्के मतदान झाले असून सुमारे ७ टक्के मतदान वाढले आहे. अपक्ष उमेदवार मनीष आनंद यांच्यामुळे मतविभाजनाचा फायदा भाजप उमेदवारांच्या पथ्यावर पडणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. सध्या शिराेळे यांचे पारडे जड असले तरी मतांचा टक्का वाढल्याने यंदा काेण विजयी हाेणार? हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात १९९९, २००४ आणि २००९ मध्ये विनायक निम्हण यांनी विजय मिळवित हॅट्ट्रिक केली हाेती. त्यानंतर २०१४ मध्ये झालेल्या तिरंगी लढतीत भाजपचे विजय काळे विजयी झाले हाेते. भाजपने २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत सिध्दार्थ शिराेळे यांना उमेदवारी दिली हाेती. त्यांना ५८ हजार ७२७ मते मिळाली हाेती. तर काँग्रेसचे दत्ता बहिरट यांनी ५३ हजार ६०३ मते घेतली हाेती. अवघ्या ५ हजार १२४ मतांनी बहिरट यांचा निसटता पराभव झाला हाेता. तेव्हा वंचित बहुजन आघाडीचे अनिल कुऱ्हाडे यांनी १० हजार ४५४ मते घेत वंचित ईम्पॅक्ट दाखवून दिला हाेता. तर यंदाही काॅंग्रेसचे बंडखाेर मनीष आनंद यांनी अपक्ष निवडणूक लढविली. ते किती मतदान घेतात? यावर काॅंग्रेस उमेदवाराचा विजय निश्चित हाेणार आहे.

भाजपतर्फे जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत सिध्दार्थ शिराेळे यांना पुन्हा संधी दिली आणि शिराेळे यांनी पूर्ण ताकदीने शिस्तबध्द प्रचाराला सुरुवात केली. मात्र, काँग्रेसतर्फे दत्ता बहिरट यांचे नाव शेवटच्या दिवशी जाहीर केले. त्यात बहिरट यांची तब्येत बरी नसल्याने ते तीन ते चार दिवस उपचारासाठी हाॅस्पिटलमध्ये दाखल हाेते. त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष मतदारसंघात फिरून प्रचार करता आला नाही. दरम्यान, याच कालावधीत काँग्रेस पक्षातर्फे इच्छुक खडकी कंटाेन्मेंट बाेर्डाचे माजी उपाध्यक्ष मनीष आनंद यांनी बंडखाेरी करीत अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. त्यामुळे मताचा टक्का वाढला तरी काँग्रेस उमेदवार बहिरट यांना मतविभाजनाचा फटका बसू शकताे, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title: Alliance or alliance, who will support the increased percentage of votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.