पुणे : राज्यात महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी जिथे शक्य होईल तिथे युती करण्यात येईल, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सोमवारी स्पष्ट केले. भाजपाला शिवसेनेशी युती करायची असेल तर पूर्ण राज्यात करावी लागेल, अशी शिवसेनेकडून मांडण्यात आलेली भुमिका दानवे यांनी स्पष्ट शब्दांमध्ये फेटाळून लावली आहे. त्याचबरोबर युतीबाबत बोलताना वाट कुणी कुणाची पाहत नाही, वाट पाहण्यात फसवेगिरी होते, असेही त्यांनी या वेळी सांगितले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रावसाहेब दानवे यांनी सोमवारी शहरातील सर्व खासदार, आमदार व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर दानवे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.दानवे म्हणाले, ‘‘राज्यातील दहा महापालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमध्ये शिवसेनेसोबत युती करण्याचे अधिकार आम्ही स्थानिक पातळीवर दिले आहेत. त्यानुसार त्या त्या ठिकाणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी बोलणी सुरू आहेत. त्यानुसार जिथे युती होईल तिथे एकत्र लढून युती न झाल्यास स्वबळावर लढू.’’पुण्यामध्ये युतीची चर्चा सुरू आहे, कुठेही युतीचे गाडे अडलेले नाही. योग्य वेळी युतीचा निर्णय जाहीर केला जाईल, असे दानवे यांनी या वेळी स्पष्ट केले. मुंबईमध्ये आम्ही शिवसेनेकडे ११४ जागा मागितल्या आहेत, त्यानुसार त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद येण्याची आम्ही वाट पाहत आहोत. दोन्ही बाजूच्या काही कार्यकर्त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला; मात्र यामुळे युतीमध्ये अडसर निर्माण व्हायला नको, अशी अपेक्षा दानवे यांनी व्यक्त केली.पुणे महापालिकेच्या निवडणुकीचा सविस्तर आढावा प्रदेशाध्यक्ष व मुख्यमंत्र्यांनी या वेळी घेतला. प्रत्येक आमदार व पदाधिकाऱ्याचे निवडणुकीच्या तयारीविषयी मत या वेळी ऐकून घेण्यात आले. पक्षाकडून करण्यात आलेल्या सर्व्हेच्या निष्कर्षांची माहिती देऊन त्यानुसार कामाला लागण्याच्या सूचना या वेळी देण्यात आल्या. (प्रतिनिधी)
शिवसेनेशी शक्य तेथेच युती
By admin | Published: January 24, 2017 1:43 AM