भगव्या गुलालाची होणारी मुक्त उधळण... डिजेच्या तालावर ठेका धरणारी तरुणाई आणि विजयी उमेदवाराला शुभेच्छा देण्यासाठी रस्त्यावर उतरलेली कार्यकर्त्यांची फौज अशा जल्लोषपूर्ण वातावरणात महायुतीचे उमेदवार अनिल शिरोळे यांच्या विक्रमी विजयचा जल्लोष साजरा झाला. दुपारी ४ च्या सुमारास कोरेगाव पार्क येथे मतमोजणी संपल्यावर सुरु झालेल्या जल्लोषाने हळूहळू उंची गाठली. ‘अबकी बार मोदी सरकार’,‘अनिल शिरोळे तुम आगे बढो’ अशा घोषणांनी वातावरण भाजपमय झाले होते. दुपारी मतमोजणी संपल्यानंतर शिरोळे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर एसएसपीएमएस मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. तेथून दुचाकीवरुन भगवे झेंडे हातात घेऊन महायुतीच्या कार्यकर्त्यांची पावले थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मोतीबागेकडे वळाली. तेथे फटाक्याच्या आतीषबाजीमध्ये शिरोळे यांचे स्वागत करण्यात आले. मोतीबागेत पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक नाना जाधव, अखिल भारतीय कार्यकर्ते सुहास हिरेमठ, पुणे महानगराचे संघचालक बापू घाटपांडे यांसह संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक उपस्थित होते. त्यानंतर तांबडी जोगेश्वरी येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात शिरोळे आले. त्यावेळी आमदार चंद्रकांत मोकाटे, भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, आरपीआयचे नेते परशुराम वाडेकर, मुरलीधर मोहोळ, मुक्ता टिळक, श्याम देशपांडे, विजय काळे, प्रविण चोरबेले, संदीप खर्डेकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
युतीचा ‘महा’ जल्लोष
By admin | Published: May 17, 2014 5:53 AM