पुणे : विधान परिषदेच्या ११ जागांची निवडणूक जाहीर झाली आहे. यातील एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) घ्यावी, अशी मागणी पुण्यातील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केली आहे. याबाबतची लेखी मागणी पुण्यातील शिष्टमंडळाने मुंबईत थेट अजित पवार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे केली. विधानसभेच्या आगामी निवडणुकीची मोर्चेबांधणी करण्यासाठी अशी एक जागा हवीच, असा युक्तिवाद त्यांनी केला आहे.
पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने यासाठी मुंबईत अजित पवार यांची भेट घेतली. पुणे जिल्ह्यात विधानसभेच्या २१ जागा आहेत. त्यातील अजित पवार यांच्या (बारामतीसह) ९ जागा पवार गटाकडेच आहेत. मात्र, यातील अनेक जागांवर लोकसभेच्या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराला मताधिक्य मिळण्याऐवजी प्रतिस्पर्धी उमेदवाराला मिळाले. खुद्द अजित पवार यांच्या बारामती विधानसभा मतदारसंघातही तीच स्थिती आहे. त्याशिवाय शिरूरमध्येही तेच झाले. पुणे शहरातील हडपसर व वडगाव शेरी या दोन जागाही तिथे मागील निवडणुकीत भाजपचा उमेदवार दुसऱ्या क्रमाकांवर असल्याने जागा वाटपात कदाचित अडचणीत येऊ शकतात असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
विधान परिषदेच्या ११ जागांमध्ये किमान १ जागा पक्षाने पुण्यासाठी घ्यायलाच हवी, असे पुण्यातील पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. राजकीयदृष्ट्या विधान परिषदेत पुण्याकडून एक आमदार असणे गरजेचे आहे. विधानसभेच्या जागा वाटपाची चर्चा होईल, त्यावेळी त्याचा चांगला उपयोग होईल, असे भेटीला गेलेल्या शिष्टमंडळातील एका पदाधिकाऱ्याने सांगितले. लोकसभेतील मताधिक्याचे कारण पुढे करत भाजपकडून विधानसभेला पुण्यात कदाचित जास्त जागा मागितल्या जातील. त्याची आधीच काळजी विधान परिषदेतील एक जागा पदरात पाडून केलेली बरी, असा विचार या मागणीमागे असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.
आम्ही अजित पवार यांची भेट घेतली व त्यांच्याकडे विधान परिषदेच्या एका जागेची मागणी केली, हे खरे आहे. अजित पवार घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असणार आहे. मात्र, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे काय म्हणणे आहे ते नेत्यांकडे नेले पाहिजे. मागणीच झाली नाही असे व्हायला नको म्हणून आम्ही भेट घेतली. - दीपक मानकर, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)