पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघातील सोसायटीच्या भागातील मतदार सकाळी ज्या प्रमाणात मतदानासाठी बाहेर पडले त्या प्रमाणात झोपडपट्टी भागातील मतदार दुपारी तीन नंतर मोठ्या प्रमाणात बाहेर पडल्याचे दिसून आले.
पुण्यातील मोठ्या झोपडपट्टी भागात हा प्रकार प्रकर्षाने जाणवला. दरम्यान, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील पाटील इस्टेट येथे मतदारांना पैसे वाटप होत असल्याचा प्रकार उघडकीस आला. यामुळे येथे दोन गटांत मोठा वाद झाला. यावेळी पैसे वाटणारा इसम पळून गेला. मात्र, याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. या काळात पाटील इस्टेट येथे मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सकाळी पहिल्या टप्प्यात म्हणजे १० वाजेपर्यंत मतदारांनी मोठी हजेरी मतदान केंद्रावर लावली होती; पण वस्ती झोपडपट्टी भागातील मतदार यात कमी होते. अनेक ठिकाणी मतदारांची नावे घेऊन कार्यकर्ते गेले; पण ते परत कधी येणार, याची वाट पाहिली जात होती.
सायंकाळी ४च्या सुमारास पाटील इस्टेट येथील coep मतदान केंद्रावर, जनता वसाहत, गोखले नगर, औंध, भवानी पेठ, येरवडा, पुणे स्टेशन, लोहियानगर, केळेवाडी, लम्हाण तांडा, कासेवाडी येथील मतदार केंद्रांवर मोठी गर्दी झाली होती.
दरवेळीप्रमाणे यंदाही सायंकाळी उत्साह
निवडणूक कुठली ही असो, मग ती महापालिका, विधानसभा की लोकसभा. झोपडपट्टी भागात मतदानाचा उत्साह हा दुपारनंतरच दिसून येतो. याला पैसे वाटप हे कारण सांगितले जात असले तरी, अनेक सुज्ञ मतदार मात्र आपला मतदानाचा हक्क सकाळीच बजावत असल्याचेही दिसून आले आहे.