राजू इनामदार
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्यातील ५ लाख इमारत बांधकाम मजुरांना कोरोना निर्बंधातील आर्थिक मदत मिळाली आहे. त्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी १५०० रुपये जमा झाले आहेत.
राज्य सरकारने कोरोना निर्बंधात आर्थिक मदत म्हणून ही रक्कम जाहीर केली होती. इमारत बांधकाम मजूर मंडळाने कामगार विभागाच्या माध्यमातून ही मदत केली. एकूण ७५ कोटी रुपये वितरीत केले. आणखी ३ लाख कामगार शिल्लक असून त्यांच्याही बँक खात्यात मंडळाकडून ही रक्कम लवकरच जमा करण्यात येईल.
कामगार मंत्रालयाकडे या कामगारांची नोंदणी होत असते. नोंदणी केलेल्या मजुरांनाच ही मदत मिळणार आहे. मंडळाने कामगार विभागाकडून नोंदणी झालेल्या मजुरांची माहिती घेऊन त्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी १५०० रुपये वर्ग केले.
कामगार विभागाच्या सर्व जिल्हा कार्यालयांमध्ये इमारत बांधकाम मजुरांची ऑनलाईन नव्याने नोंदणी करत आहे. त्यासाठी मजुरांना कर्मचारी तसेच त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था सहकार्य करत आहेत. तशा सूचना त्यांना वरिष्ठ स्तरावरून दिल्या आहेत. नव्याने नोंदणी झालेल्यांनाही ही मदत मिळणार आहे.
कामगार मंत्री हसन मुश्रीफ व कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंघल, कामगार आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या पाठपुराव्यामुळे ही मदत त्वरित वितरीत झाली. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. घरेलू कामगार महिलांनाही सरकारने अशीच मदत जाहीर केली असून त्याच्या अंमलबजावणी बाबतही डॉ. गोऱ्हे यांनी आदेश दिले होते.
---
घरेलू कामगार अजून उपेक्षितच
राज्यातील १० लाखांपेक्षा अधिक घरेलू महिला कामगार मात्र या १५०० रुपयांच्या सरकारी मदतीपासून अद्याप वंचित आहेत. त्यांच्यासाठी असलेल्या घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे असलेल्या नोंदीबाबत काही अडचणी येत आहेत. या मंडळाचे मागील सरकारने पुनरुज्जीवनच केले नसल्याने त्यांचे कामकाजच ठप्प असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
कोट
मागील कोरोना टाळेबंदीत मंडळाने मजुरांना आर्थिक मदत केली होती. त्यामुळे नोंदणी झालेल्या मजुरांच्या बँक खात्याच्या माहितीसह सर्व तपशील कामगार विभागाकडे होता. तो मंडळाला दिला. नव्याने नोंदणी झालेला तपशीलही त्यांना दिला आहे.
- शैलेंद्र पोळ, अतिरिक्त कामगार आयुक्त