सेंट्रल काऊन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनने ५८ प्रकारच्या शस्त्रक्रिया आयुर्वेदातील ‘शल्यतंत्र’ आणि ‘शालाक्यतंत्र’ या नावाखाली असलेल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात समाविष्ट केल्या आहेत. या निर्णयाला विरोध करत इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे बंद पुकारण्यात आला. आयुष डॉक्टरांनी मात्र या निर्णयाचे स्वागत करत गुलाबी फित लावून काम केले.
------------------
निर्णयाचा विरोध :
साडेचार वर्षे पदवी आणि ३ वर्षे पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर ५० लाख रुपयांचा बाँड भरुन दोन वर्षे प्रॅक्टिस करावी लागते. त्याशिवाय स्वत:ची प्रॅक्टिस सुरु करता येत नाही. आयुर्वेदिक डॉक्टरांना हे कौशल्य सहा महिन्यांत शिकणे शक्य नाही. कौशल्य पूर्णपणे अवगत नसताना शस्त्रक्रिया केल्यास गुंतागुंत निर्माण होऊ शकते. त्याची जबाबदारी कोण घेणार? कोणत्या अॅलोपथी डॉक्टरांनी कोणत्या शस्त्रक्रिया कराव्यात, याबाबत नियम आहे. मग, आयुर्वेद डॉक्टरांना सरसकट परवानगी देणे धोकादायक आहे.
- डॉ. आरती निमकर, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, पुणे
--------------------
आयुर्वेदिक डॉक्टरांना शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण दिले जात नाही. त्यांना शस्त्रक्रियेचे सखोल प्रशिक्षण देऊन सर्जनचे सहाय्यक म्हणून काम करण्याची परवानगी देता येऊ शकते. मुख्य डॉक्टर आणि रुग्णांमध्ये खूप मोठी गॅप असते. ती भरुन काढण्याचे काम आयुर्वेदिक डॉक्टर करु शकतात. मात्र, त्यांना थेट शस्त्रक्रियेची परवानगी देणे अयोग्य ठरेल.
- डॉ. जगदीश हिरेमठ, ह्रदयरोगतज्ज्ञ
--------------------
निर्णयाचे स्वागत :
कायद्यामध्ये नवीन काहीच नाही. आयुर्वेदात ४० वर्षांपासून शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. राजपत्रामुळे केवळ कायद्यात सुस्पष्टता आली आहे. दीड लाख आयुष डॉक्टरांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. गुलाबी फीत लावून पाठिंबा दिला आहे, रक्तदान शिबिरे आयोजित केली आहेत. या निर्णयातून आयुर्वेदाला चालना मिळणार आहे. आयएमए या निर्णयाला विरोध करुन एकाधिकारशाहीची भूमिका घेत आहे. वैद्यकशास्त्र ही कोणाचीही मक्तेदारी नाही. मिक्सोपॅथीचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे अॅलोपॅथीच आहे. सुश्रुतसंहितेमध्ये ३०० हून अधिक शस्त्रक्रियांचा उल्लेख आहे, हे विसरुन चालणार नाही.
- डॉ. आशुतोष गुप्ता, सचिव, आयुष कृती समिती
-------------------
कोणतेही तंत्र हे शास्त्रातील क्रांती असते. वैद्यकशास्त्रही आधुनिक होत आहे. १९९१ पासूनच आयुर्वेदिक डॉक्टर शस्त्रक्रिया करत आहेत. त्यामुळे सीसीआयएमच्या निर्णयातून नवा कोणताही नियम पुढे आलेला नाही. हे तुमचे, ते आमचे असे करणे योग्य नाही.
- डॉ. श्रीकांत काशीकर, आयुर्वेदतज्ज्ञ