पुणे : मुठा कॅनॉल फुटला आणि होत्याचे नव्हते झाले, अनेकांचा संसारच वाहून गेला. नेसत्या वस्त्रानिशी वाचलेले अनेक कुटुंबीय पुढे काय? या प्रश्नाने हतबल झाले. शासकीय पातळीवर मदतीचे प्रयत्न सुरू असताना स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा अश्विनी कदम सरसावल्या आणि अनेकांच्या वाहून गेलेल्या संसाराला आधार देण्यासाठी संसारोपयोगी साहित्यांचे वाटप करून छोटासा; पण भरीव दिलासा दिला.
त्यासाठी स्वत:च्या वाढदिवसावर होणारा खर्च टाळून आपत्तीग्रस्त कुटुंबीयांना मदत करा, हे त्यांनी सोशल मीडियावर केलेले आवाहन प्रभावी ठरले आणि अनेकांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. खासदार वंदना चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत दांडेकर पूल परिसरातील अनेक कुटुंबीयांना या संसारोपयोगी साहित्यांचे वाटप करण्यात आले. ज्या वस्तूंची गरज आहे ती मिळताच अनेक महिलांचे चेहरे आनंदी दिसले. छोटासा, पण महत्त्वाचा हातभार आमच्या संसाराला लावल्याबद्दल त्या महिलांकडून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या उपक्रमात स्थानिक नगरसेविका प्रिया गदादे , सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादीचे पदाधिकारी नितीन कदम, मनाली भिलारे सहभागी झाले होते.