गणपती बाप्पासमोर ५ ढोल वादकांना वादनाची परवानगी द्या; पुण्यातील गणेश मंडळांचे पोलीस आयुक्तांना निवेदन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2021 12:14 PM2021-09-02T12:14:18+5:302021-09-02T12:16:12+5:30
सलग दुसऱ्या वर्षी गणेशोत्सव कोरोनाच्या सावटाखाली होत आहे
पुणे : पुण्यातील गणेश मंडळांनी यंदाही गणेशोत्सव साधेपणानं आणि सर्व नियम, अटी पाळून साजरा करण्याचं निश्चित केलंय. दरवर्षी अतिशय उत्साहात अन् ढोल पथकांच्या वादनात गणरायाचे आगमन होते. मात्र मागच्या वर्षीप्रमाणे यंदाही कोरोनाने तो आनंद हिरावून घेतल्याने उत्सव मंडपासमोर किमान पाच ढोल वादकांना वादनाची परवानगी द्यावी. अशी मागणी शहरातील गणेश मंडळांनी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदन मंडळांनी आयुक्तांना दिलंय.
सलग दुसऱ्या वर्षी गणेशोत्सव कोरोनाच्या सावटाखाली होत आहे. त्यामुळे यंदा सार्वजनिक मंडळांची संवाद साधल्यानंतर शहर पोलीस दलाच्या वतीने गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर करण्यात करण्यात आली आहे. मूर्ती खरेदी नागरिकांनी शक्य तो ऑनलाईन खरेदी करावी. मूर्तीच्या स्टॉलजवळ गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी गणेश आगमन श्री आगमन व विसर्जन मिरवणुक काढण्यात येऊ नये. श्री आगमन व विसर्जनच्या विधीसाठी कमीत कमी लोक एकत्र जमतील. गणेश प्रतिष्ठापना सार्वजनिक गणेश मंडळांची मंदिरे आहेत. त्यांनी मूर्तीची प्रतिष्ठापना मंदिरात करावी. अन्यन्य साधारण परिस्थितीत मनपाचे नियम व अटींचे पालन करुन मंडळास छोटे मंडपाकरीता परवानगी दिली जाईल. असे नियम लागू करण्यात आले आहेत. या नियम व अटींचे स्वागत करत मंडळांनी उत्सव साधेपणाने करण्याचे ठरवलं आहे.
गणेश मंडळांनी केलेल्या मागण्या
- उच्च न्यायालयाने निर्देश केल्याप्रमाणे गणेश मंडळांना त्यांच्या परिसरात जाहिरात कमान टाकण्यास परवानगी द्यावी
- गणेश उत्सव मंडळासमोर ढोल पथकांतील पाच जणांना स्थिर वादन करण्याकरिता परवानगी मिळावी
- २०१६ साली मान्य नियमाप्रमाणे रनिंग मंडप परवानगी द्यावी
या मागण्यांचे निवेदन आयुक्तांना दिले. प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी, शहराध्यक्ष रमेश बागवे, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे संजय बालगुडे, वीर हनुमान मित्र मंडळाचे दत्ता सागरे, गुरुदत्त मंडळाचे उदय महाले, पुणे बढाई समाज ट्रस्टचे शैलेश बढाई, सहकार तरुण मंडळाचे भाऊ करपे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे महेश सूर्यवंशी, गणेश पेठ पांगुळ आळी सार्वजनिक गणेश मंडळ ट्रस्टचे विलास ढमाले आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.