पुणे : जागतिक स्तरावर पोहोचलेला पुणे शहरातील गणेशोत्सव कोरोना आपत्तीमुळे गेली दोन वर्षे होऊ शकलेला नाही. यावर्षी मात्र गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा करण्याचा निर्णय सर्वच गणेश मंडळांनी घेतला असून, या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेश मंडळांना दरवर्षीऐवजी पाच वर्षांसाठी एकत्र परवानगी द्यावी, अशी मागणी जय गणेश व्यासपीठाच्यावतीने करण्यात आली आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दरवर्षी महापालिका तसेच पोलिसांकडूनही मंडप उभारणीपासून मिरवणुका, सांस्कृतिक कार्यक्रम आदींसाठी विविध परवानग्या घ्याव्या लागतात. यंदा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्णय सर्वच गणेश मंडळांनी घेतला असून, त्याकरिता जय गणेश व्यासपीठातर्फे शहराच्या उपनगरांमधील गणेश मंडळांची बैठक नुकतीच घेण्यात आली. या बैठकीला अरण्येश्वर, पर्वती, एरंडवणे, येरवडा, धनकवडी, लष्कर यांच्यासह विविध भागांतील मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, सुनील रासने, अखिल मंडई मंडळाचे संजय मते, तुळशीबाग मंडळाचे विकास पवार, नितीन पंडित, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचे परेश खांडके, खडक मंडळाचे ऋषिकेश बालगुडे आणि महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप उपस्थित होते.
या बैठकीनंतर जय गणेश व्यासपीठाच्यावतीने महापालिका आयुक्त विक्रमकुमार आणि पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडे निवेदन देऊन गणेश मंडळांना पाच एका वर्षाऐवजी पाच वर्षांची एकदम परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली. दरवर्षी गणेश मंडपाची जागा तीच असल्याने, तरीसुद्धा दरवर्षी परवानगी घेणे बंधनकारक असते. त्यातच मंडप, जाहिरात कमान, स्पीकर्स, आगमन व विसर्जन मिरवणुकीसाठी काही बदल होत नाही. त्यामुळेच आम्ही पाच वर्षांकरिता मागणी केली असल्याचे जय गणेश व्यासपीठाने सांगितले.