लोकमत न्यूज नेटवर्क
रांजणगाव गणपती : शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी ८० ते १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन शिरूर तालुका कृषी अधिकारी शिरीष भारती यांनी केले आहे.
याबाबत मंडल कृषी अधिकारी धनंजय हिरवे व कृषी सहायक अनिल देशमुख यांनी सांगितले की, गेल्या आठ दिवसांपासून महाराष्ट्रात कमीअधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. परंतु तो सर्वदूर सारख्या प्रमाणात पडलेला नाही. कोकण सोडून इतर ठिकाणी तुरळक पाऊस पडत आहे. सोयाबीन, तूर, भुईमूग व मका या पिकांच्या नियोजनाकरिता शेतकऱ्यांनी पेरणीची पूर्वतयारीची कामे करावीत. खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन या पिकांसाठी जमिनीच्या प्रकारानुसार जमिनीची निवड पूर्वमशागतीची कामे करावीत. सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, मका या खरीप पीक पेरणीसाठी शेतजमीन नांगरणी व वाखराच्या पाळ्या देऊन जमिनीची चांगली मशागत करावी. विशेषतः मोठ्या प्रमाणात खरीप पिके घेणाऱ्या शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला, खंडाळे, बुरुंजवाडी, गणेगाव खालसा, वरुडे, वाघाळे, पिंपळे धुमाळ यांसह इतर गावच्या शेतकऱ्यांनी खरीप पिकांसाठी किमान ८० ते १०० मिमी इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. अपुऱ्या ओलाव्यावर पेरणी केल्यानंतर पावसाचा खंड पडल्यास पेरणी वाया जाऊ शकते. तसे दुबार पेरणीची संकट उभे राहू शकते. चांगला पाऊस झाल्यावर पुरेशा खोलीवर ओलावा जातो व पावसाचा खंड जरी पडला तरी पीक तग धरू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन महाराष्ट्र शासन कृषी विभाग शिरूर तालुक्याच्या वतीने करण्यात येत आहे.