पुणे: तीस वर्ष वयाच्या पुढच्या पुणेकरांचे सरसकट लसीकरण करायला परवानगी द्यावी अशी मागणी पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे यावर तातडीने कार्यवाही करावी असेही त्यांनी सांगितले आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. ११ फेब्रुवारी ला असणारी साडेचार हजार रुग्णांची संख्या महिनाभरातच जवळपास २१,७७८ वर पोहोचली आहे. वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर पुण्यात सरसकट लसीकरणाला परवानगी द्यावी अशी मागणी गेले काही दिवस सातत्याने केली जात आहे. साधारण पंधरा दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत केंद्राकडे सरसकट लसीकरणाची तसेच पुण्याला पुरवल्या जाणाऱ्या रस्त्यांची संख्या वाढवण्याची मागणी करण्याचा निर्णय झाला होता. त्याच पार्श्वभूमीवर खासदार बापट यांनी हे पत्र लिहिले आहे.
पुणे शिक्षणाचे माहेरघर आहे मात्र याच शहरात शाळा कॉलेज सुरू करून बंद करावे लागले. त्यामुळे लाखो तरुण मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे तसेच निर्बंधांमुळे आर्थिक उलाढालीवर देखील परिणाम होत आहे. आत्ताच्या लसीकरणाचा वेग पाहता वर्षभरात लसीकरण होणार नाही. हे लक्षात घेता पुणे शहराला जास्त लसी पुरवून तीस वर्षाच्या वरच्या सर्व नागरिकांचे लसीकरण करावे असे बापट यांनी या पत्रात म्हटले आहे. सिरम चा कोविशिल्ड बनवणारा प्लांट पुण्यात आहे. त्याचाही फायदा शहराला घेता यावा असेही या पत्रात म्हटलेले आहे. तसेच यातून हे शहर पहिले कोरोना मुक्त शहर होऊ शकेल असाही दावा बापट यांनी केला आहे.