यवत : कोरोनामुळे मागील वर्षभराहून अधिक काळापासून कलाकेंद्र बंद आहेत. ती सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य तमाशा थिएटर चालक-मालक संघाचे अध्यक्ष डॉ. अशोक जाधव यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे केली आहे. राज्य सरकारपर्यंत लावणी कलावंतांची व्यथा खासदार सुप्रिया सुळे यांनी पोहोचवावी यासाठी निवेदनदेखील या वेळी देण्यात आले.
कोरोनाच्या साथीबाबत आढावा घेण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे दौंड तालुक्यात आल्या होत्या. या वेळी लावणी कलावंतांच्या व्यथा त्यांनी आवर्जून थांबून जाणून घेतल्या. याचबरोबर त्यांचे प्रश्न राज्य सरकारपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले.
मागील वर्षभरापासून राज्यातील कलाकेंद्र बंद आहेत. त्यामुळे या कलेवर अवलंबून असलेल्या कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक कलाकार जमेल तेथे रोजंदारीची कामे अथवा छोटे-मोठे व्यावसाय करून कशीबशी गुजरान करत आहेत. शासनाने योग्य ते नियम व अटींची बंधने घालून कलाकेंद्र सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
शासनाने घातलेली सर्व बंधने काटेकोरपणे पाळू, मात्र किमान पोटापुरते उत्पन्न मिळावे, यासाठी तरी व्यवसाय सुरू करण्यास परवानगी मिळावी अशी या कलाकारांची अपेक्षा आहे. परवानगी दिल्यास नियम न पाळणाऱ्या कलाकेंद्रावर कारवाई करण्यात यावी. पण, ही केंद्रे सुरू नसल्याने हजारो कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. याची गांभीर्याने दखल घेतली जावी अशी अपेक्षा यावेळी लावणी कलावंतांच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
खासदार सुप्रिया सुळे यांनी लावणी कलावंतांच्या व्यथा जाणून घेतल्या याबाबत समाधान वाटले. त्यांनी आमचे म्हणणे शासन दरबारी मांडून सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची विनंती करणार असल्याचे सांगितले असल्याची माहिती थिएटर मालक संघटनेचे अध्यक्ष डॉ. अशोक जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
वाखारी (ता. दौंड) येथे कलाकेंद्राच्या व्यथा सुप्रिया सुळे यांच्याकडे मांडताना डॉ. अशोक जाधव त्य़ावेळी उपस्थित माजी आमदार रमेश थोरात व इतर मान्यवर.