लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सध्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्य सरकारने मालिका, चित्रपट, वेबसिरीज व लघुपटांच्या चित्रीकरणास बंदी घातली आहे. मात्र, दुसरीकडे इतर राज्यांकडून चित्रीकरणास परवानगी दिली आहे. यामुळे निर्मिती संस्थांकडून आणि वाहिन्यांकडून मालिका आणि चित्रपटांचे चित्रीकरण महाराष्ट्राबाहेर हलविले आहे. चित्रीकरण बंद असल्याने शासनाचाही महसूल बुडत आहे, त्यामुळे राज्य सरकारने मालिका, चित्रपट, वेबसिरीज आणि लघुपटांच्या चित्रीकरणास काही कडक नियम आणि अटी लागू करून परवानगी द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
बॉलिवूड ही महाराष्ट्राची शान असून, सध्या हा उद्योग महाराष्ट्राबाहेर नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. यापासून वेळीच सावध होऊन या उद्योगाला संजीवनी द्या, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
मालिका, चित्रपट, वेबसिरीज आणि लघुपटांच्या चित्रीकरणास पुन्हा एकदा ब्रेक लागला आहे. त्यामुळे विविध हिंदी वाहिन्यांकडून मालिकांचे चित्रीकरण राज्याबाहेर करत आहे. इतर राज्यांनीही मालिका आणि चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी परवानगी दिली आहे. इतर राज्यांमध्ये चित्रीकरण व्यवस्थितपणे आणि योग्य आर्थिक नियोजनात होऊ लागले तर हा उद्योग राज्याबाहेर जाण्यास वेळ लागणार नाही. या उद्योगावर अवलंबून असणारे महाराष्ट्रातील कलाकार, तंत्रज्ञ आणि कामगार यांच्याकडे काम राहणार नाही. काही हजार कोटींचा वार्षिक उलाढाल असणाऱ्या या उद्योगामधून राज्य सरकारलाही मोठा महसूल मिळतो. बॉलिवूड महाराष्ट्राबाहेर हलविण्याचा सध्या प्रयत्न सुरू आहे. यापासून आपण सावध राहणे आवश्यक आहे. हा उद्योग टिकावा, यासाठी चित्रीकरण होणे गरजेचे असून, कडक नियम लागू करून चित्रीकरणास परवानगी द्यायला हवी. कमी लोकांमध्ये चित्रीकरण करणे, सुरक्षित अंतर-मास्क बंधनकारक-सॅनिटायझेशन या त्रिसूत्रीचा अवलंब करणे, रोज आरोग्य तपासणी करणे, कोरोना चाचणीही बंधनकारक करणे, सार्वजनिक ठिकाणी चित्रीकरण टाळणे, असे नियम चित्रीकरणाच्या दरम्यान लागू करण्यात यावेत, असेही निवेदनात सुचविले आहे.