पुणे : रेमडेसिविर इंजेक्शनच्या पुरवठ्यात अद्यापही सुसूत्रता आलेली नसून रुग्णांना हे इंजेक्शन मिळत नसल्याच्या तक्रारी सुरूच आहेत. त्यामुळे पालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांसाठी थेट कंपनीकडून हे इंजेक्शन खरेदी करण्याची मागणी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी केली. याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना देण्यात आले आहे.
शहरात फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोनाची दुसरी लाट झपाट्याने पसरत गेली आहे. रुग्णांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. पालिकेने कोट्यवधींचा निधी खर्च करीत कोविड केअर सेंटर आणि रुग्णालयांमध्ये उपचार वाढविले आहेत. जम्बो रुग्णालयासह दळवी, डॉ. नायडू, मुरलीधर लायगुडे, खेडेकर रुग्णालय बोपोडी, बाणेर येथील डीसीएचसी आणि ईएसआय रुग्णालय बिबवेवाडी या रुग्णालयांमध्ये मिळून १ हजार ६९० कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. यातील व्हेंटिलेटर तसेच अतिदक्षता विभागातील रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शनची गरज भासते आहे. पालिकेला दररोज एक हजार इंजेक्शनची आवश्यकता असते.
पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना हे इंजेक्शन मिळावे यासाठी पालिकेने हे इंजेक्शन तयार करणाऱ्या कंपनीला वर्क ऑर्डर देऊन खरेदी करण्याची तयारी दाखविली आहे. सिप्ला, मायलेन यांसह मोठ्या वितरकांना देखील पालिकेने संपर्क करून हे इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. मात्र, हे इंजेक्शन केवळ राज्य सरकारला आणि जिल्हाधिकारी यांनाच उपलब्ध करून देण्याचे आदेश अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे असल्याने हे इंजेक्शन पालिकेला देण्यास संबधित कंपन्यांनी असमर्थता दाखविली आहे.
इंजेक्शनची गरज भागविण्यासाठी पालिकेला तातडीने ही इंजेक्शन उपलब्ध करून देण्याचे आदेश संबंधित कंपन्यांना द्यावेत. पालिकेची खरेदी पूर्ण होत नाही, तोपर्यंत राज्य सरकारच्या वतीने दिला जाणारा इंजेक्शनचा पुरेसा कोटा पालिकेला उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी बिडकर यांनी केली आहे.
-----
पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना पालिकेच्या माध्यमातून रेमडेसिविर इंजेक्शन देण्याची तयारी दर्शविली आहे. इंजेक्शनचा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे पालिकेने १२ हजार इंजेक्शन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याशी चर्चा झाली आहे.
- गणेश बिडकर, सभागृह नेता, पुणे महापालिका