पुणे: दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्याकडून पुणे पोलिसांना पालखी प्रवेशासाठी परवानगी मिळण्याबाबतचे पत्र दिले आहे. परंतु, रात्री उशिरापर्यंत पुणे पोलीसांकडून त्यांना परवानगी दिली गेली नाही. याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असून, शिवाजीनगर पोलीसांकडून शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांशी बैठक घेतली जात असल्याचे सांगण्यात आले आहे.
भक्तिमय वातावरणात श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वार महाराज पालखी सोहळा दोन वर्षाच्या खंडानंतर सुरू झाला आहे. आज (दि. २२ जून, बुधवारी) शहरात दोन्ही पालख्यांचे आगमन होणार आहे. पुणे पोलिसांकडून त्यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी परवानगीशिवाय पालखी सोहळ्यात प्रवेश नसल्याचे सांगितले होते. दरम्यान, आता संभाजी भिडे यांच्याकडून शिवाजीनगर पोलीसांना परवानगीबाबतचे पत्र देण्यात आले आहे. परंतु, रात्रीउशिरापर्यंत परवानगी दिलेली नसल्याचे शिवाजीनगर पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे. तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखीनेही प्रस्थान केले आहे. लाखो वारकरी आळंदी आणि देहूत दाखलही झाले आहेत. दोन्ही पालख्यांचे प्रस्थान झाल्यावर एकाच दिवशी संचेती हॉस्पिटलजवळून पुण्यात प्रवेश करतात. त्यावेळी हॉस्पिटलजवळ संभाजी भिडे धारकऱ्यांसहित पालखी सोहळ्यात सहभागी होतात. मात्र यंदा भिडे यांना पोलीस परवानगीशिवाय पालखी सोहळ्यात घुसता येणार नाही. असे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी स्पष्ट सांगितले होते. संभाजी भिडे यांच्यामुळे मागील पालखी सोहळ्याच्या वेळी काही वादाच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे वादाचे प्रसंग टाळण्यासाठी पोलीस परवानगीशिवाय कोणालाही पालखी सोहळ्यात प्रवेश करता येणार नसल्याचे गुप्ता यांनी यावेळी स्पष्ट केले.