पुणे : कोरोनाच्या संसर्गामुळे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यामुळे सर्व उद्योगधंद्यांची वाताहत झाली. यामध्ये फिटनेस व क्रीडा क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ना सरकारची मदत ना कोणते अनुदान यामुळे व्यावसायिकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. कोरोनाशी लढण्यासाठी रोगप्रतिकारक क्षमता चांगली असणे महत्त्वाचे आहे. व्यायामामुळे निरोगी व सदृढ राहण्यास मदत होते. याचा विचार करून जिम सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी पुणे फिटनेस क्लब असोसिएशन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना- शारीरिक सेनेने केली आहे.
नियमित व्यायाम, सकस आहार आणि स्वच्छ हवा हे घटक आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यास गरजेचे आहेत. हे जगभरातील संशोधनातून सिद्ध झाले आहे, असे असोसिएशनचे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना- शारीरिक सेनेचे अध्यक्ष नीलेश काळे यांचे म्हणणे आहे.
पुढे ते म्हणाले की, कॅलिफोर्निया विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या संशोधनातून हेच सिद्ध झाले आहे की, व्यायाम न करणाऱ्यांच्या तुलनेत नियमित व्यायाम करणाऱ्या व्यक्तींमध्ये कोरोनाचे कोणतेही गंभीर परिणाम दिसून येत नाही. अशा व्यक्तींमध्ये कोरोनाचा प्रभाव सौम्य स्वरूपाचा असल्याचे समोर आले आहे.
व्यायामशाळा बंद ठेवण्याचा निर्णय चुकीचा
माहिती आणि संशोधनाच्या पार्श्वभूमीवर व्यायामशाळा बंद ठेवण्याचा निर्णय हा चुकीचा आहे, असे आमचे मत आहे. नियमांचे पालन करून व्यायामशाळा सुरू करण्यास परवानगी सरकारने द्यावी, असेही काळे म्हणाले.