पुणे : कृषी सेवक भरतीसाठी भारांकन पद्धतीचा अवलंब करण्याच्या शासन निर्णयाला परीक्षार्थी उमेदवारांनी तीव्रविरोध केला आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परीक्षार्थींना न्याय द्यावा, अन्यथा पुण्यातील कृषी आयुक्तालयासमोर फाशी घेऊन आत्महत्या करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी कृषी पदवीधरांनी केली आहे. त्याच प्रमाणे शासनाने यासंदर्भातील अध्यादेश मागे घेऊन महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी)भरती प्रक्रिया राबवावी या मागणीचे निवेदन फडणवीस यांना पाठविले आहे.राज्याच्या कृषी सेवक पदाच्या भरतीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्यामुळे परीक्षेची निवड यादी रद्द करण्यात आली. मात्र, या प्रकरणी दोषींची चौकशी करून त्यांच्यावर करवाई करण्यात आली नाही. त्यातच सदर परीक्षा नव्याने न घेता शासन निर्णय काढून भारांकन पद्धतीने दहावी आणि कृषी पदवी किंवा पदविका परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे सेवकांची निवड करण्याचा निर्णय घेतला. त्यास परीक्षार्थी उमेदवारांचा विरोध असून भारांकनाचा निर्णय जबरदस्तीने लादला जात असून त्यामुळे अनेकांचे नुकसान होणार आहे, अशी परीक्षार्थी उमेदवारांची भूमिका आहे. भरती प्रक्रियेत मोठा घोटाळा झालेला असताना भरती रद्द करून नव्याने भरती प्रक्रिया राबविणे आवश्यक आहे. मात्र, भारांकन पद्धतीने भरती करून भ्रष्टाचार करण्याचा आणखी एक मार्ग शासनाने उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे परीक्षार्थी उमेदवारांमध्ये संतापाची भावना आहे. शासनाचा हाच पारदर्शी कारभार आहे का? असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी एमपीएससीतर्फे पुन्हा परीक्षा घेण्यात यावी, भरतीत घोटाळा करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, कृषी विभागातील विविध अधिकारी पदाची ८०० पदे तत्काळ भरावीत आदी मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे.
आत्महत्येची परवानगी द्या
By admin | Published: April 24, 2017 4:57 AM