पुणे : महाविद्यालयातील ग्रंथपाल पदाच्या मुलाखतीसाठी तातडीने परवानगी द्यावी. तसेच खासगी विनाअनुदानित संस्थेमधील ग्रंथपालांना समान काम समान वेतन हे धोरण ठेवून विद्यापीठ अनुदान आयोगाने निर्धारित केलेल्या वेतनश्रेणीनुसार वेतन मिळावे. या मागण्यांसाठी गुरुवारी १२ ऑगस्टला राष्ट्रीय ग्रंथपाल दिनापासूनच पुणे, नागपूूर आणि कोल्हापूर येथे बेमुदत साखळी उपोषण केले जाणार आहे. महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघ तसेच आरोग्य विज्ञान महाविद्यालयीन ग्रंथालय व क्रीडा शिक्षक संघातर्फे हे पाऊल उचलण्यात आले आहे.
अशी माहिती महासंघाचे अध्यक्ष डॉ. रविंद्र ज्ञानोबा भताने यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी महासंघाचे विश्वस्त दिलीप भिकुले, पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा ग्रंथपाल संघाचे अध्यक्ष प्रदीप बागल, क्रीडा शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रा.संदीप चोपडे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शिक्षक संघाचे अध्यक्ष डॉ. सोपान राठोड उपस्थित होते.
ग्रंथालय हा महाविद्यालयाचा आत्मा समजला जातो. महाविद्यालयात गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा शासनाचा उद्देश पूर्ण करण्यात ग्रंथपाल महत्वाची भूमिका बजावतो. मात्र महाविद्यालयातील एवढे महत्वाचे पद शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे अनेक वर्षांपासून रिक्त राहिले आहे. शासनाने अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयातील ग्रंथपाल पदांची भरती प्राचार्य पदाच्या भरतीच्या धर्तीवर सुरू करणे, 4 मे 2021 च्या पदभरतीवर निर्बंध लादण्याअगोदर ज्या महाविद्यालयांना शासन नियमानुसार पदभरतीची परवानगी मिळाली आहे.
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी 27 जून रोजी संघटनेच्या पदाधिका-यांसोबत पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन आठ दिवसात पदभरतीचा शासन निर्णय काढण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र एक महिना उलटला तरी त्यावर कसलीच कारवाई झाली नसल्याचे डॉ. भताने यांनी सांगितले.
आत्मह्त्यांची परवानगी द्या
आमचा अंत बघू नका. ग्रंथपाल अत्यंत बिकट परिस्थितीत जगत आहेत. शासनाला जोपर्यंत पात्रताधारक आत्महत्या करणार नाहीत तोपर्यंत जाग येणार नसेल तर मुख्यमंत्री, उच्च शिक्षण मंत्री व वित्तमंत्री यांनी आम्हाला आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी राज्यातील पात्रताधारकांनी केली आहे.
''उच्च व तंत्र शिक्षण मंत्री जोपर्यंत आठ दिवसात शासन निर्णय काढण्याचे दिलेले आश्वासन अद्यापही पाळले नाही. त्यामुळे आता जोपर्यंत शासन निर्णय निघणार नाही तोपर्यंत पुणे, नागपूर आणि कोल्हापूर याठिकाणी बेमुदत साखळी उपोषण आम्ही करणार आहोत. असे ग्रंथपाल महासंघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. रविंद्र भताने यांनी सांगितले.''