बारामती : विविध प्रकल्पांमुळे बारामतीची भुरळ कायम राहिली आहे. याच विकासाचे बारामती मॉडेल अभ्यासण्यासाठी दिल्लीस्थित पॉलिसी रिसर्च स्टडी या संस्थेचे ३८ खासदारांचे संसदीय सहायक (लँप- लेजिस्लेटिव्ह असिस्टंट टू मेंबर ऑफ पार्लमेंट) दोन दिवसांच्या बारामती दौऱ्यावर पोहचले आहेत.
खासदारांना त्यांच्या कामकाजात विविध प्रकारची मदत करण्याच्या उद्देशाने पॉलिसी रिसर्च स्टडी या संस्थेच्या वतीने दरवर्षी देशभरातून काही युवकांची नियुक्ती केली जाते. परीक्षा व मुलाखतींद्वारे वेगळे कौशल्य असलेल्या २१ ते २५ वर्षे वयोगटातील युवकांना थेट खासदारांसमवेत दिल्लीत वर्षभर काम करण्याची संधी देण्यात येते.
संसदेचे पावसाळी अधिवेशन ते बजेट अधिवेशनापर्यंत हे युवक खासदारांच्या कामात त्यांना थेटपणे मदत करतात. संसदेत उपस्थित करायचे प्रश्न, त्यांची भाषणे लिहून देणे, त्यांना इतर कामकाजात मदत करणे अशा स्वरुपाची कामे या युवकांकडून केली जातात.
असेच ३८ खासदारांचे संसदीय सहायकांनी शुक्रवारी (ता. ७) कृषी विज्ञान केंद्र, डेअरी, इनक्युबेशन सेंटर, बारामती नगरपालिकेला भेट दिली. तसेच विकासाच्या राबविलेल्या प्रकल्पांची पाहणी केली. शनिवारी (ता. ८) हे सहायक बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्क, विद्या प्रतिष्ठान या संस्थांना ते भेट देणार आहेत.
बारामती हे विकासाचे मॉडेल म्हणून पुढे आले आहे. प्रत्यक्षपणे विकास कसा झाला आहे, ते पाहण्याच्या उद्देशाने आम्ही बारामतीत आलो आहोत. या दौऱ्यात आम्ही ज्या ३८ खासदारांसमवेत काम करत आहोत, त्यांना आम्ही केलेल्या विविध पाहणीचा अहवाल सादर करणार असल्याचे खासदार संसदीय सहायक निलेश साळुंके यांनी सांगितले.