सध्या ढगाळ वातावरणामुळे शेतीपिकांवर अळी, मावा, तुडतुडे याचा प्रार्दुभाव दिसून येत आहे. तरकारी पिकांवर तसेच फळभाज्या, पालेभाज्या व फळांवर हिरव्या, पिवळ्या तसेच काळ्या माव्याचा प्रार्दुभाव दिसत असल्याने हाताशी आलेली नगदी पिके रोगास बळी पडत आहेत हे पाहून बळीराजाच्या चिंतेत वाढ झाली आहे. सततच्या ढगाळ हवामानामुळे कितीही औषधे मारली तरीही मावा, अळी, तुडतुडे तसेच सर्वच प्रकारच्या किडी आटोक्यात येण्याची शक्यता दिसत नाही. एकीकडे शेतमालाला बाजारभाव नाही. आणि दुसरीकडे औषधे व औषध फवारणीच्या वाढीव खर्चाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. तसेच कांदा पिकावर करप्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. हरभऱ्यावर घाटे पोखरणाऱ्या अळीचा प्रार्दुभाव दिसुन येत आहे. तर गव्हावर मावा तसेच उसावर लोकरी मावा दिसून येत आहे. त्यातच हवामान खात्याने अवकाळी पावसाची तसेच गारपिटीची शक्यता व्यक्त केल्याने बळीराजा धास्तावला आहे. गेल्या वर्षभरापासून शेतकऱ्यांवर एकामागून एक नैसर्गिक व मानवनिर्मित संकटे येत असल्याने बळीराजा पुर्णपणे मेटाकुटीला आला आहे. शेतकऱ्यांसमोर वारंवार येत असलेेेली संकटे संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. यांतून दिलासा मिळावा म्हणून शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लावावा व शेतकऱ्यांची कर्जे माफ करावीत अशी अपेक्षा शेतकऱ्यांनमधून व्यक्त होत आहे.
शेतकरी वर्गासोबतच सर्वसामान्य नागरिकही अवकाळीच्या सावटाखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 4:28 AM