खळद : पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळ हे येथील जनतेला त्रास, कष्ट, पीडा देऊन, त्यांचा जीव घेऊन होणार नाही, तर विश्वासात घेऊन त्यांना पसंत पडले, त्यांनी मान्यता दिली तरच विमानतळ होईल, असा विश्वास येथील बाधित गावांतील शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी गुरुवारी दिला. याकामी प्राथमिक अवस्थेत होत असणाऱ्या ओएलएस सर्व्हेला सहकार्य करण्याची विनंती केली.पारगाव मेमाणे येथे पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानळासाठी बाधित होणाऱ्या गावच्या शेतकऱ्यांशी आज त्यांनी जाहीर चर्चा केली.यावेळी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक जय जाधव, विमानतळ प्राधिकरणाच्या कटारिया मॅडम, बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, भाजपा युवामोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आ. योगेश टिळेकर, प्रांत संजय अस्वले, तहसीलदार सचिन गिरी, पोलीस उपविभागीय अधिकारी अशोक भरते, सासवडचे पोलीस निरीक्षक सुरेंद्रसिंह गौड, जेजुरीचे सहायक पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, मंडलाधिकारी संजय बडधे आदी प्रमुख उपस्थित होते.या वेळी बोलताना जिल्हाधिकारी राव यांनी, सर्व्हे म्हणजे विमानतळ झाले असे नाही, तर हा सर्व्हे झाल्यानंतरच ही जागा विमानतळासाठी योग्य की अयोग्य, हे ठरणार आहे. हा सर्व्हे ज्यावेळी होईल त्यावेळी मी पुन्हा तुमच्यासमोर चर्चेसाठी येईल व त्यावेळी विमानतळासाठी किती सरकारी जागा जात आहे, वनविभागाची जमीन किती जात आहे व कोणते गावठाण जात आहे, कोणाची बागायती जमीन जात आहे हे संपूर्ण चित्र तुमच्या समोर मांडले जाईल, यामध्ये आपल्या विचारानेच क्षेत्र आजूबाजूला सरकवत कमीत कमी शेतजमीन जाईल याचा प्रयत्न केला जाईल. त्यावर आपली संमती असेल तरच पुढील चर्चा होईल. नकार देण्यापूर्वी प्रक्रिया काय आहे, प्रकल्प कसा आहे ते समजून घ्या असे आवाहन केले. यावेळी आमदार योगेश टिळेकर यांनीही शेतकऱ्यांची समजूत काढली. यावेळी शेतकऱ्यांच्यावतीने सर्वेक्षण होऊ देणार नाही. अकरा महिने राहिल्यानंतर घर सोडताना भाडेकरूलाही त्रास होतो तर आमच्या अनेक पिढ्या येथे गेल्या आहेत. आमच्या भावनांचा विचार करा. हुकूमशाही करू नका. दिवाळीसुद्धा केली नाही.अशा विविध विरोधी प्रतिक्रिया पारगावचे सरपंच सर्जेराव मेमाणे, सुनंदा खेडेकर, महादेव कुंभारकर, पोपट मेमाणे, चंद्रकांत फुले, पंडोल, राणी झुरंगे, देविदास कामथे, नंदा टिळेकर, अमोल कामथे, राहुल कुंभारकर, सतीश कुंभारकर, मनीषा होले, अर्चना मेमाणे, मगराज राठी , दत्ता झुरंगे यांनी मांडल्या. गणेश मेमाणे यांनी नागरिकांना आपले मत शांततेत मांडण्याचे व जिल्हाधिकारी साहेबांचे विचार शांततेत ऐकण्याचे आवाहन केले. (वार्ताहर)
शेतकऱ्यांना बरोबर घेऊनच विमानतळ
By admin | Published: November 18, 2016 6:07 AM