पुणे : महापौरबदलाच्या हालचाली सध्या थंडावलेल्या असल्या, तरी राष्ट्रवादीअंतर्गत काही नावांमध्ये चुरस सुरूच आहे. त्याचबरोबर आता स्थायी समितीच्या सदस्य व अध्यक्षपदासाठीही रस्सीखेच सुरू झाली आहे. आघाडी धर्म पाळून समितीचे अध्यक्षपद काँग्रेसला द्यायचे की तोंडावर आलेली सार्वत्रिक निवडणूक लक्षात घेऊन स्वत:कडेच ठेवायचे, याचा निर्णय राष्ट्रवादीच्या ज्येष्ठांना घ्यावा लागणार आहे.नियमाप्रमाणे फेब्रुवारीअखेर स्थायी समितीचे आठ सदस्य त्यांची दोन वर्षांची मुदत पूर्ण होत असल्याने निवृत्त होत आहेत. राष्ट्रवादीचे सभागृह नेते बंडू केमसे, समितीचे माजी अध्यक्ष बापूराव कर्णे, नंदा लोणकर, शारदा ओरसे, राजश्री आंदेकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राहुल तुपेरे, अनिल राणे व काँग्रेसचे मुकारी अलगुडे हे सदस्य निवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागेवर त्या-त्या पक्षाचे तेवढेच सदस्य नव्याने निवडले जातील. सदस्य निवडीनंतर लगेचच मार्चमध्ये समितीच्या विद्यमान अध्यक्ष अश्विनी कदम यांची अध्यक्षपदाची मुदत पूर्ण होत असल्याने त्याही पदासाठी निवडणूक होईल.पालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादीबरोबर काँग्रेसची आघाडी आहे. आघाडीमध्ये झालेल्या पदवाटपानुसार यंदा समितीचे अध्यक्षपद काँग्रेसला मिळणे अपेक्षित आहे. त्यासाठी काँग्रेसमध्ये अविनाश बागवे, चंद्रकांत कदम यांच्यात स्पर्धा आहे. बागवे यांनी समितीतील आपली कामगिरी पक्षश्रेष्ठींसमोर ठेवत या पदासाठी दावा केला आहे. कदम यांनी आतापर्यंत आपल्याला डावलेले गेले आहे, त्यामुळे आता हे पद द्यावे, अशी मागणी केली असल्याचे समजते. त्याचबरोबर निवृत्त होणारे सदस्य मुकारी अलगुडे यांच्या जागेवर नव्याने नियुक्त होणारे सदस्यही या पदासाठी दावा करू शकतात. मात्र, राष्ट्रवादीच्या बहुसंख्य नगरसेवकांचे मत काँग्रेसला समितीचे अध्यक्षपद देऊ नये, असे आहे. पालिकेच्या पंचवार्षिकचे हे अखेरचे वर्ष आहे. नवी सार्वत्रिक निवडणूक या वर्षअखेरीस होईल. त्यामुळे स्थायी समितीसारख्या महत्त्वाच्या आर्थिक समितीचे पद काँग्रेसला देऊन आपल्या पायावर धोंडा टाकून घेऊ नये, असे राष्ट्रवादीच्या प्रमुख नगरसेवकांना वाटते. त्यांनी तसे स्पष्टपणे पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्याकडे कळवले असल्याचे समजते. पवार यांनीच मागील अध्यक्षपद निवडीच्या वेळी काँग्रेसला हे पद देण्याचा शब्द दिला होता. आता तो शब्द पाळायचा की राजकीय महत्त्व लक्षात घेऊन अध्यक्षपद स्वत:कडेच ठेवायचे, असा पेच त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)
महापौरपदाबरोबरच आता स्थायी समितीसाठीही रस्सीखेच
By admin | Published: January 08, 2016 1:46 AM