पुणे : पर्यावरणात होणाऱ्या घातक बदलांपासून भावी पिढीचे संरक्षण करण्यासाठी जनजागृतीसोबतच संशोधन, न्यायिक निर्णय आणि सरकारचे कठोर नियंत्रण फार महत्त्वाचे आहे, असे केंद्रीय पर्यावरण व माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज येथे सांगितले. रोटरी क्लब आॅफ पुणे हडपसर यांच्या वतीने ‘एन्व्हायरो व्हिजन’ या पर्यावरणविषयक चर्चासत्रात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रोटरी प्रांतपाल विवेक अऱ्हाना होते.जावडेकर म्हणाले, की पर्यावरणातील आणि वातावरणातील बदल हा विषय गंभीरपणे घेतला जात नाही. वातावरणातील कार्बनचे प्रदूषण वाढले असून, त्यामुळे समुद्राची पातळी गेल्या तीन-चार दशकांमध्ये ६ इंचांनी वाढली आहे. ती आगामी काळात वेगाने वाढतच जाणार आहे.पर्यावरण प्रकल्पांची अंमलबजावणी ढिसाळपणे होत असल्याबद्दल आणि प्रलंबित विषय मार्गी लागत नसल्याबद्दल खेद व्यक्त करून जावडेकर यांनी अशा प्रकल्पांमधील अनियमितता यापुढे सहन केली जाणार नाही. नागरिकांनी पर्यावरणरक्षणाच्या नियमांचे पालन केले नाही तर त्यांना मोठी किंंमत मोजावी लागेल, असा इशारा दिला.घरगुती, औद्योगिक सांडपाणी आणि कृषी क्षेत्रातील त्याज्य पदार्थ मोठ्या प्रमाणात नद्यांमध्ये, जलस्रोतांमध्ये टाकले जातात. जलप्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असून ते रोखणे ही काळाची गरज आहे, असेही ते म्हणाले.विश्वंभर चौधरी यांनी पर्यावरण जपण्यासाठी शाश्वतता आणि सर्वसमावेशकता ही दोन तत्त्वे सांभाळली पाहिजेत, असे सांगितले. भरत शितोळे, हेमंत जगताप, एन. आर. करमळकर, संजय आठवले, महेंद्र घागरे, विनोद बोधनकर, जी. एन. कुलकर्णी, अनिल मेहेरकर यांनीही विचार मांडले. हडपसर क्लबचे अध्यक्ष अनिल शितोळे, पर्यावरण विभागप्रमुख मकरंद टिल्लू उपस्थित होते. (प्रतिनिधी)
जनजागृतीसोबतच कठोर नियंत्रण महत्त्वाचे
By admin | Published: July 28, 2014 4:40 AM