पुणे : संक्रांतीचा सण जवळ आला की, पतंगबाजीला सुरुवात होते. यात नायलॉनचा मांजा वापरल्याने पक्ष्यांचा प्राण तर जातोच, नागरिकांचे गळेही चिरले जाऊन निष्पाप जीव जात आहेत. नायलॉन मांजावर बंदी असतानाही बाजारात ते मिळते. संबंधितांवर कारवाई का केली जात नाही, असा सवाल पक्षीप्रेमींनी विचारला आहे.
पतंग उंच उडविण्याची मजा काही औरच असते; पण त्यासाठी पतंगाला नायलॉनचा मांजा लावला जातो. कारण साधा मांजा असेल तर तो उंच जात नसल्याचे बोलले जाते. त्यामुळे बहुतांशजण नायलॉन मांजा घेऊन इतरांचा पतंग कट करत असतात. त्यातून ते पतंगबाजीचा आनंद मिळवतात; परंतु या नायलॉन मांजामध्ये पक्षी आणि दुचाकीस्वार दोघेही बळी ठरत आहेत.
सध्या शहरात विविध टेकड्यांवर, पुलांवर पतंगबाजी केली जात आहे. त्यामध्ये नायलॉन मांजाचा वापर होत आहे. गेल्या काही वर्षांपासून नायलॉन मांजा कुठे झाडावर अडकला की, त्यामध्ये पक्षी अडकतात आणि पीळ बसून त्यांचा जीव जातो. बऱ्याचदा दुचाकीस्वार जाताना मांजा उठून आला की, त्यांच्या गळ्यावरच जातो. दुचाकीस्वार वेगात असतो आणि नायलॉनमुळे त्यांचा गळा चिरला जातो. ते गाडी थांबवेपर्यंत गळा चिरलेला असतो.यापूर्वी एक महिला शिवाजीनगर येथील पुलावरून जाताना तिचा गळा चिरल्याने जागीच मृत्यू झाला होता. गळ्यावरच श्वास नलिका असते आणि ती तुटल्याने रक्तप्रवाह खूप जातो. यात प्राण गमवावा लागतो. म्हणून नायलॉनचा मांजा वापरणे अत्यंत घातक ठरत आहे.
तक्रार करणे आवश्यक
१९८६ च्या पर्यावरण संरक्षण कायद्याच्या कलम ५ नुसार या मांजाच्या विक्री व वापरावर राज्य सरकारने बंदी घातलेली आहे. तरीही अशा मांजाची विक्री आणि त्याचा वापर केला जात आहे. कलम १८८ अंतर्गत नायलॉन किंवा चिनी मांजाची विक्री आणि वापर करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यासाठी पोलिसांकडे तक्रार करणे आवश्यक असते. हा गुन्हा जामीनपात्र असला तरी यासाठी एक महिना तुरुंगवास किंवा दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. तसेच कोणी या मांजामुळे जखमी झाल्यास इतर कलमांनुसार त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.
मुलांनी असे नायलॉनचे मांजे वापरू नयेत
पक्ष्यांना मांजामुळे जीव गमवावा लागतो. खरंतर पतंगबाजी करताना मांजा वापरणे अत्यंत घातक आहे. आताच अनेक ठिकाणी मांजात अडकलेले पक्षी पाहायला मिळत आहेत. मुलांनी असे नायलॉनचे मांजे वापरू नयेत. - विशाल तोरडे, पक्षीमित्र