पुणे : पुणेपोलिसांच्या गुन्हे शाखेने आतापर्यंत पुणे, कुरकुंभ, सांगली आणि दिल्ली येथे छापेमारी करीत तब्बल ३ हजार ६०० कोटी रुपयांचे सुमारे १८०० किलो मेफेड्रोन (एमडी) जप्त केले. संदीप धुनिया हा या प्रकरणातील मुख्य आरोपी असून, सध्या तो देशाबाहेर असल्याचे पोलिस तपासात समोर आले. शनिवारी (ता. २४) संदीप धुनियाबरोबरच आणखी दोन मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले असून, पुणे पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत. या दोघांविरोधातदेखील पोलिसांनी लूकआउट नोटीस जारी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आंतरराष्ट्रीय रॅकेट उघडकीस येण्याची दाट शक्यता
पुणे पोलिसांकडून युद्धपातळीवर आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेट उघडकीस येण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. यासोबतच देशविरोधी कारवायांसाठी अमली पदार्थ विक्रीच्या पैशांचा वापर झाला आहे का? यादृष्टीनेदेखील हे प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) किंवा नार्कोटिक कंट्रोल ब्युरो (एनसीबी)कडे हस्तांतरित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, पुणे पोलिसांनी यावर आक्षेप घेत हा तपास स्वत:कडे ठेवण्याचा आग्रह पोलिस महासंचालकांकडे केल्याची माहितीदेखील सूत्रांनी दिली.
धुनियाच्या गर्लफ्रेंडचा सहभाग
सध्या या ड्रग प्रकरणातील मुख्य आरोपी संदीप धुनिया याची गर्लफ्रेंड ड्रग संदर्भातील आर्थिक व्यवहार बघत असल्यासंदर्भातील काही पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यामुळे तिचादेखील शोध पोलिस घेत आहेत.