पुणे : पुण्यातल्या बाजार समितीमध्ये रत्नागिरीचा हापूस हा कर्नाटक आंबा म्हणून जप्त करण्याचा प्रकार गुलटेकडी मार्केट यार्डात घडलाय. अजब म्हणजे हा आंबा कोणत्या जातीचा तपासण्यासाठी कोणताही अनुभव नसणाऱ्या एका परप्रांतीयाला बोलावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार सुध्दा घडलाय. तर शेतकऱ्यानं विनवणी करूनही बाजार समितीच्या कर्मचाऱ्याने शेतकऱ्यांना दमदाटी केलीये.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डात सोमवारी शेतकरी महादेव लक्ष्मण काळे यांनी दापोली येथून हापूस आंब्याच्या शंभर पेट्या विक्रीसाठी आणल्या होत्या. पण हा आंबा कर्नाटक आंबा असल्याचं म्हणत बाजार समितीने शेतकऱ्यांच्या पेट्या ताब्यात घेतल्यात. त्यानंतर शेतकऱ्यानं सातत्यानं विनवणी करूनही त्यांना प्रतिसाद न देता उलट शेतकऱ्यालाच दमदाटी करण्यात आली. त्यामुळे बाजार समितीकडून चोर सोडून संन्याशाला फाशी असा प्रकार घडला आहे. तब्बल दोन लाखांचा हा रत्नागिरी आंब्यांचा शेतकऱ्याचा माल आहे. त्यात जर बाजार समितीनं शेतकऱ्याला अशी चोराची वागणूक दिली तर गेले दोन वर्षांपासून हवालदिल झालेले शेतकरी कोणाच्या भरवश्यावर आपला माल शहरात विकतील? हा प्रश्न गंभीर आहे. यापूर्वी कर्नाटक हापूस आंबा रत्नागिरीचा हापूस दाखवून फसवणुकीचा प्रकार समोर आला होता. त्या पार्श्वभूमीवर बाजार समितीने कडक पावलं उचलायला सुरवातही केली, मात्र आजच्या प्रकारामुळे खऱ्या शेतकऱ्याला नाहक त्रास सहन करावा लागलाय.
माल खालील गाळ्यावर उतरवणे आवश्यक होते
''तो व्यापारी आहे. तिकडील नगराध्याशाकडून खरेदी केलेला हा माल आहे. तो नवीन असला तरी अडत्या जुना आहे. अडत्याने तो माल खालील गाळ्यावर उतरवणे आवश्यक होते. शेतकरी असो किंवा व्यापारी , बाजार समितीच्या अधिकारी कर्मचारी यांचे वागणे, बोलणे नम्रतेचे असावे असे मधुकांत गरड(, प्रशासक, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे) यांनी सांगितले.''
शेतकऱ्यांनी माल विकायचा की यांचा त्रास सहन करायचा
''पाच वाजल्यापासून बाजार समितीचे कर्मचारी त्रास देत आहेत. शेतकऱ्यांनी माल विकायचा की यांचा त्रास सहन करायचा. दोन लाख रुपयांचा माल आहे. तो वेगळ्या वेगळ्या जागेवर उचलून ठेवला जातोय. त्यामुळे माल खराब होऊ शकतो. याला जबाबदार कोण आहे असे महादेव काळे यांनी सांगितले.''