लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना संसर्गाची होणारी वाढ लक्षात घेता, यापुढे महापालिका, नगर परिषदा व नगरपंचायतींच्या स्थायी समिती व विषय समितीची बैठकही ऑनलाईन पध्दतीने घेण्याबाबतचे आदेश राज्य शासनाने नुकतेच दिले आहेत़
शासनाने हे आदेश देताना कोविड-१९ संदर्भातील उपाययोजनांसाठी अत्यंत अपरिहार्य कारणास्तवच स्थायी समिती व विषय समित्यांची बैठक घेणे आवश्यक असल्यास ती प्रत्यक्ष घ्यावी, अन्यथा इतर कारणांसाठीच्या सर्व बैठका या ऑनलाईन पध्दतीनेच घ्याव्यात असेही स्पष्ट केले आहे.
पुणे महापालिकेत गेल्या वर्षभरापासून मुख्य सर्वसाधारण सभाही ऑनलाईन पध्दतीने होत आहेत. मात्र, विषय समित्यांच्या व स्थायी समितीची बैठक ही प्रत्यक्ष होत होती. पण, यापुढे सदर आदेशामुळे या सर्व बैठका/सभा ऑनलाईनच घेणे बंधनकारक राहणार आहे.
---------------------
बैठक तहकूब
स्थायी समितीची बैठक ऑनलाईन घेण्याबाबत राज्य शासनाकडून सूचना आल्या आहेत. त्याअनुषंगाने यापुढे स्थायी समितीची बैठक ऑनलाईन घेण्याबाबत महापालिका प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात येत आहे अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली. दरम्यान, मंगळवारी होणारी स्थायी समितीची बैठक माजी खासदार संभाजी काकडे यांच्या निधनामुळे तहकूब करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.
-----------------------