पुणे : महापालिकेच्या वतीने उभारल्या जाणाऱ्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या न्यासामध्ये (ट्रस्ट) पालिका पदाधिकारी, गटनेते आणि सहा अधिकाऱ्यांची संचालक म्हणून नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
या वैद्यकीय महाविद्यालयासाठी न्यास स्थापन करण्यास मुख्यसभेची व शासनाने मंजुरी दिलेली आहे. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेते, विरोधी पक्षनेत्या, पालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त (जनरल), उप आयुक्त सामान्य प्रशासन आणि आरोग्य प्रमुख यांची सर्वप्रथम नियुक्ती करण्यात करण्यात आली. त्यानंतर काँग्रेस, शिवसेना, मनसे, एमआयएम आणि रिपाइं या पक्षांच्या पक्षनेत्यांना सदस्य म्हणून नियुक्त करण्यास मंजुरी देण्यात आली.
मंगळवारी शहर अभियंता बांधकाम, मुख्यलेखापाल या अधिकाऱ्यांसह इतर अधिकारी मिळून ७ सदस्य नियुक्त करण्यास स्थायीने मंजुरी दिली. त्यामुळे ही सदस्य संख्या २१ होणार आहे.