लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गेल्या काही दिवसांत शहरी भागासोबतच ग्रामीण भागातदेखील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. शहरामध्ये अनेक खाजगी हाॅस्पिटल कोविड पेशंटसाठी ताब्यात घेतली आहेत. ग्रामीण भागातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन जिल्ह्यातील देखील खाजगी हाॅस्पिटल ताब्यात घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सर्व प्रांत अधिकारी यांना दिले आहेत.
जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आली असून परिस्थिती दिवसेंदिवस अत्यंत गंभीर होत आहे. सध्या जिल्ह्यात दररोज दहा हजार नवीन कोरोना रुग्णांची भर पडत असताना ग्रामीण भागात देखील दररोज सरासरी दोन हजार कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत तीन-साडेतीन हजार रुग्ण सापडत असताना मोठ्या प्रमाणात खाजगी हाॅस्पिटल ताब्यात घेतली होती. आता तर दररोज तब्बल दहा हजार नवीन रुग्ण सापडत आहेत. यामुळेच १५ दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी शहरातील खाजगी हाॅस्पिटल ताब्यात घ्या. यामध्ये काही हाॅस्पिटल तर शंभर टक्के कोविड हाॅस्पिटल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार २५ पेक्षा अधिक खाजगी हाॅस्पिटल पुणे शहरामध्ये ताब्यात घेतले. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात देखील खासगी हाॅस्पिटल ताब्यात घेऊन कोविड हाॅस्पिटल म्हणून जाहीर करा, असे आदेश जिल्हाधिकारी देशमुख यांनी दिले आहेत. ग्रामीण भागात बारामती, खेड, भोर तालुक्यांतील काही खाजगी हाॅस्पिटल ताब्यात घेण्यात आल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले.