कोरोना प्रादुर्भाव वाढत असताना चेक पोस्ट ड्यूटी, कुटुंब सर्वेक्षण केले आहे. मात्र, कोरोना लसीकरण
बाबत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांना अद्याप लस न देता सर्वात आधी शाळा सुरू करूनही सर्व शिक्षक लसीकरणापासून वंचित का? असा सवाल आंबेगाव तालुका माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ अध्यक्ष अशोक वळसे पाटील व सचिव विनोद बोंबले यांनी केला आहे.
तालुक्यात सर्व आरोग्य कर्मचारी व प्राथमिक शिक्षक यांचे कोरोना लसीकरण केले आहे. मात्र, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांचे कोरोना लसीकरण अद्याप केले नाही. याबाबत मुख्याध्यापक संभाजी लोखंडे म्हणाले की, इयता ९ वी ते १२ वीचे वर्ग नोव्हेंबर महिन्यात सुरू झाले. प्रत्यक्षात अध्यापन झाले. मात्र, २२ फेब्रुवारीला पुन्हा शाळा बंद झाल्या. राज्यात सर्वात आधी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सुरू झाल्या. तर ५ वी ते ८ वी चे वर्ग २७ जानेवारीला सुरू झाले. म्हणजे २३ नोव्हेंबर रोजी ९ वी ते १२ वी वर्ग, तर ५ वी ते ८ वी वर्ग २७ जानेवारीला सुरू झाले. प्रत्यक्ष वर्गात ज्यांना अध्यापन करायचे आहे, त्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांचे लसीकरण होणे गरजेचे असताना
त्याबाबत शासन व आरोग्य विभाग दुजाभाव करत आहे.
कोरोना लॉकडाऊन काळात व त्यानंतर सातत्याने माध्यमिक शिक्षकांनी चेक पोस्ट ड्यूटी, कुटुंब सर्वेक्षण केले. त्यानंतर मुलांना अध्यापन केले.त्यांना कोरोना लसीकरण करायला हवे होते. जेव्हा ९ वी ते १२ वीचे वर्ग सुरू होण्यापूर्वी सर्व शिक्षकांची कोरोना टेस्ट केली. पण, लस उपलब्ध होताच माध्यमिक शिक्षकांना लसीकरण पासून वंचित ठेवले आहे. इतरांचे लसीकरण करण्याची घाई जशी केली, तसे माध्यमिक शिक्षकांचे कोरोना लसीकरण त्वरित करून घ्यावे अशी मागणी आंबेगाव तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष अशोक वळसे पाटील, कार्याध्यक्ष दादासाहेब जाधव, सचिव विनोद बोंबले, सुनील वळसे पाटील, संभाजीराव लोखंडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात केली आहे.