बारामती: बारामती तालुक्यातील काटेवाडीतील अल्ताफ महंमद शेख (Altaf Shaikh) यांनी देखील यूपीएससी परीक्षेत बाजी मारली आहे. यूपीएससी परीक्षेत त्यांनी ५४५ वा क्रमांक मिळवत आयपीएस पदासाठी पात्र झाले आहेत. याआधी अल्ताफ यांनी २०१५ साली युपीएसची परीक्षा पास होऊन केंद्रीय गृह खात्यात डीवायएसपी पदावर रुजू झाले होते. अल्ताफ शेख यांच्या यशाबद्दल सर्व स्थरांतून कौतुक होत आहे. अल्ताफ यांनी शालेय वयात भजी व चहा विक्रीचे कामही केले होते आणि आता त्यांनी थेट आयपीएस पदापर्यंत धडक मारल्याने शेख यांची यशोगाथा कौतुकास्पद ठरत आहे.
सुरवातीला शेख उत्तर प्रदेश मधील सितापूर जिल्ह्यात कार्यरत होते. त्या नंतर आता फेब्रुवारीमध्ये त्यांची बदली उस्मानाबाद इथं झाली होती. वयाच्या २२ व्या वर्षी अल्ताफ हे पहिल्यांदा यूपीएससीची परीक्षा पास झाले. त्यानंतर नोकरी करत आता पुन्हा एकदा आयपीएससाठी त्यांची निवड झाली आहे. शेख हे एका सर्वसामान्य कुटुंबातील आहेत.
अल्ताफ शेख यांच्या यशाबद्दल त्यांचे कौतुक केले जात आहे. राष्ट्रवादी नेत्या सुप्रिया सुळेंनीही शेख यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. दुसऱ्या एका ट्विटमध्ये सुप्रिया ताईंनी, बारामती तालुक्यातील काटेवाडी येथील अलताफ शेख यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उज्ज्वल यश प्राप्त केले. त्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि सुनेत्रावहिनी यांच्या पुढाकारातून सुरु झालेल्या राष्ट्रवादी करीयर अकॅडमीतून परीक्षेची तयारी केली होती.' अशी माहितीही दिली.