पुणे : सध्या जगभरात कोरोना विषाणूमुळे सार्वजनिक ठिकाणांसह कार्यालये, दुकाने आदी ठिकाणी नागरिकांच्या शरीराचे तापमान ‘थर्मल थर्मामिटर’द्वारे तपासले जाते. परंतू, या थर्मामिटरच्या किंमती आणि त्यामध्ये असलेल्या त्रुटी याचा विचार करुन पुण्यातील तरुणाने ‘मानवी तापमान नियंत्रक हेडबँड’तयार केला आहे. या यंत्रामुळे शारीरिक तापमान मोजणे, ते नियंत्रित ठेवणे आणि त्यावर लक्ष ठेवणे नागरिकांना शक्य होणार आहे.पिंपळे सौदागर येथे राहणाऱ्या चंद्रवदन चांडक यांनी हा हेडबँड तयार केले आहे. चांडक हे मेकॅनिकल इंजिनिअर आहेत. त्यांनी आठ वर्षे अमेरिकेमध्ये नोकरी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतात लॉकडाऊन लागण्याच्या अवघ्या काही दिवस आधी ते भारतात परत आले. जगभरातील कोरोना विषयक माहिती वाचत असताना त्यांना शरीराचे तापमान मोजणारे छोटे यंत्र तयार करण्याची कल्पना सुचली. बऱ्याच देशांनी थर्मल स्क्रिनिंगसाठी रोबोट बनविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. यासोबतच सध्या वापरल्या जात असलेल्या थर्मल गनही महागड्या आहेत. या गनद्वारेही नागरिकांच्या शरीराचे तापमान तपासले जाते. सध्या या गनही पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाहीत.चांडक यांनी तयार केलेल्या हेडबँडमध्ये 'टेम्परेचर सेंसर' बसविण्यात आला आहे. तापमान तपासण्याचे तंत्रज्ञान वापरुनच हा हेडबँड तयार करण्यात आला आहे. यामध्ये शरीराचे तापमान एका विशिष्ट मयार्देबाहेर वाढले तर यंत्रामधून अलार्म वाजणार आहे. यासोबतच सूचना देणारे ‘लाईट फंक्शन ’ही देण्यात आले आहे. यामध्ये आवश्यकतेनुसार आणखी बदल आणि सुधारणा करण्यात येणार असल्याचे चांडक यांनी सांगितले. लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांना हा हेडबँड वापरता येऊ शकणार आहे. चांडक यांनी त्यांच्या निर्मितीच्या पेटंटसाठी अर्ज दाखल केला असून पंतप्रधान कार्यालयासह विविध केंद्रिय कार्यालयांना त्यांच्या निर्मितीची माहिती देणारे ई-मेलही केले आहेत.
पुण्यातील तरुणाने तयार केला ‘थर्मल थर्मामिटर’ला पर्याय; 'हेडबँड'ची निर्मिती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2020 6:40 PM
शरीराच्या तापमानावर स्वत: लक्ष ठेवणे होणार शक्य
ठळक मुद्देलहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांना हा हेडबँड वापरता येऊ शकणार